एखादी भूमिका जीवंत आणि वास्तव व्हावी यासाठी कलाकार आपल्यापरीने प्रयत्न करत असतो. त्या भूमिकेसाठी तो विशेष मेहनतही घेतो. यातून त्याला समाधान तर मिळतेच, पण ती भूमिकाही पडद्यावर तितक्याच ताकदीने साकार झालेली प्रेक्षकांना पाहायला मिळते. आगामी ‘भातुकली’ चित्रपटासाठी अभिनेता अजिंक्य देव चक्क व्हायोलिन वाजवायला शिकला तर ‘हॅप्पी जर्नी’ चित्रपटासाठी अतुल कुलकर्णीने अरेबिक भाषेचे धडे गिरविले.
‘भातुकली’चित्रपटात अजिंक्यने व्हायोलिन वाजविले आहे. दोन ते अडीच मिनिटांचा ‘म्युझिक पीस’ अजिंक्यने यात वाजविला आहे. चित्रपटात अजिंक्य जी व्यक्तिरेखा रंगवतोय त्याने महाविद्यालयात असताना व्हायोलिन वाजविलेले असते. जवळपास वीस वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर अचानक त्याला पुन्हा व्हायोलिन वाजवावे लागते, असा प्रसंग चित्रपटात आहे. या दोन ते अडीच मिनिटांच्या प्रसंगासाठी अजिंक्यने व्होयोलिनची चक्क शिकवणी लावली आणि आपले व्हायोलिन वादन खरेखुरे वाटेल, असा प्रयत्न केला.
‘वृत्तान्त’शी बोलताना अिजक्य म्हणाला, वर्सोवा येथील ज्येष्ठ व्हायोलिनवादक रामदास यांच्याकडे माझा मुलगा व्हायोलिन शिकतोय. चित्रपटातील माझा व्हायोलिन वादनाचा प्रसंग अधिक वास्तव व्हावा यासाठी मी त्यांच्याकडे दोन महिने व्हायोलिनची शिकवणी लावली. या दोन महिन्यात व्हायोलिन हातात कसे पकडायचे, ते कसे वाजवायचे, याचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. माझ्या चित्रीकरणाच्या व्यापातून वेळ काढून मी त्यांच्याकडे शिकायला जात होतो. व्हायोलिन वादन वास्तव वाटले पाहिजे, असा चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित जोशी यांचाही आग्रह होता. त्यामुळे मी ते शिकलो.
‘हॅप्पी जर्नी’ चित्रपटात अतुल कुलकर्णी मोठय़ा उद्योगपती/ व्यावसायिकाची भूमिका साकारत आहे. दुबई येथे अनेक वर्षे नोकरी केल्यानंतर चित्रपटातील ‘निरंजन’ ही व्यक्तिरेखा तिकडेच स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करते. हा माणूस तेथेच अनेक वर्षे राहिलेला असल्याने साहजिकच त्याला अरेबिक भाषा चांगली अवगत असते आणि बोलताही येते. काही वर्षांनी तो भारतात परततो. येथे असताना त्याला एकदा दुबईतून दूरध्वनी येतो आणि ‘निरंजन’ दूरध्वनीवर अरेबिक भाषेत बोलतो.
भाषेचे उच्चार आणि भूमिका अधिक जीवंत व्हावी यासाठी आपण अरेबिक भाषेचे धडे गिरविले. यासाठी आम्ही अरेबिक भाषा तज्ज्ञ शमीम सय्यद यांची मदत घेतली. माझा जो संवाद होता तो अरेबिक भाषेत त्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित करून घेतला.
मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो संवाद मी वारंवार ऐकला, पाठ केला. पूर्ण संवादात दहा ते बारा वाक्ये आहेत. अरबी भाषेची लकब, नेमके उच्चार, बोलण्याची ढब हे सारे मी परत परत घोटविले, सय्यद यांच्याकडून समजून घेतल्याचे अतुल कुलकर्णीने सांगितले.
‘ला अलामै गिदर कला मल्हेन अन अल्हैन शई मजहूल’ (नो. आय अ‍ॅम बिझी राईट नाऊ)
‘आना एर्जा सवी टेलिफोन अन्त. बाह सलाम’. (आय विल कॉल यु व्हेन आय अ‍ॅम बॅक)
-अतुल कुलकर्णी