Atul Kulkarni in Pahalgam Kashmir : काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन या छोटा स्वित्झर्लँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनस्थळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अनेक पर्यटक ताबडतोब हा प्रदेश सोडून घरी परतले आहेत. वेगवेगळ्या राज्यांमधील पर्यटक काश्मीरमध्ये अडकले होते. अनेक राज्य सरकारांनी विशेष विमानांनी या पर्यटकांना परत आणलं. तर काही जण परतीच्या मार्गावर आहेत. दहशतवादी हल्ला होण्यापूर्वी काश्मीरमधील प्रत्येक पर्यटनस्थळांवर शेकडो पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळत होती. मात्र आता अनेक ठिकाणं ओस पडली आहेत. काश्मीरमधील हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी आपल्या सहली रद्द केल्या आहेत.

पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे काश्मीरच्या पर्यटनाला मोठा फटका बसू लागला आहे. हे राज्य प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून असल्यामुळे तिथल्या लोकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मात्र, एक लोकप्रिय मराठी अभिनेता काश्मिरी लोकांच्या मदतीसाठी, तिथल्या पर्यटनाला फटका बसू नये यासाठी धडपड करत असल्याचं दिसत आहे. या अभिनेत्याचं नाव आहे अतुल कुलकर्णी.

अतुल कुलकर्णी थेट पहलगाममध्ये दाखल

काश्मीरमध्ये सध्या तणाव असला तरी अतुल कुलकर्णी नुकताच काश्मीरमध्ये दाखल झाला आहे. त्याने तिथल्या एका स्थानिक काश्मिरी व्यक्तीबरोबर गप्पा मारतानाचा फोटो समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. यासह त्याने पहलगाममला भेट दिली आहे. झेलम नदीच्या किनारी उभा राहून त्याने काही फोटो काढले, जे त्याने एक्सवर शेअर केले आहेत. यासह त्याने त्याच्या चरोळ्या व हॅशटॅगमधून लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

अतुलची खास कविता

चलिए जी कश्मीर चलें
सिंधु, झेलम किनार चलें
कश्मीरियत की बात सुनें
कश्मीरियों की बात बनें
चलिए जी, कश्मीर चलें
हमको यहाँ आना है
आतंक को हराना है

अशी एक कविता अतुलने एक्सवर शेअर केली आहे. चला काश्मीरला जाऊ, सिंधू, झेलमच्या किनाऱ्यावर जाऊ, काश्मिरी लोकांचं म्हणणं ऐकू, काश्मिरी लोकांमध्ये मिसळू, चला काश्मीरला जाऊ. आम्हाला इथेच यायचं आहे, दहशतवादाला हरवायचं आहे, असा त्याच्या कवितेचा अर्थ आहे.

रिकामं विमान पाहून अतुलचं लोकांना आवाहन

काश्मीरला जाणाऱ्या विमानातील केबिनचा फोटो अतुलने शेअर केला आहे. संपूर्ण विमान रिकाम होतं. ते पाहून अतुलने म्हटलं आहे की “पूर्वी ही विमानं प्रवाशांनी भरलेली असायची. असंख्य पर्यटक काश्मीरला जात होते. आपल्याला ही विमानं परत भरायची आहेत. आपल्याला दहशतवादाला हरवायचं आहे.”