Actor Atul Parchure Died : चतुरस्त्र मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं यकृताच्या कर्करोगाशी झुंजताना निधन झालं आहे. तीन वर्षांपूर्वी अतुल परचुरेंना कर्करोग झाला होता, कर्करोगावर मात करून ते बाहेर आले होते. मराठी चित्रपटरसिकांनी, परचुरे यांच्या चाहत्यांनी त्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं होतं. मात्र ते त्यातून पूर्णपणे बरे झाले नव्हते. या कर्करोगाशी लढा देत असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या मागे त्यांची आई, पत्नी व मुलगी असं कुटुंब आहे.

मराठी नाटक, मालिका व चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दरम्यान, चित्रपट क्षेत्रातील त्यांचे मित्र, सहकलाकार व त्यांचे चाहते समाजमाध्यमांद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत, अतुल परचुरेंच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. दरम्यान, अतुल परचुरेंच्या एका मुलाखतीमधील छोटासा भाग इन्स्टाग्राम, युट्यूबसह इतर समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अतुल परचुरे जगायचं कसं, लोकांशी वागायचं कसं, कोणासाठी किती उपलब्ध राहायचं, तुमचे खरे मित्र कोण आहेत यावर भाष्य करताना दिसत आहेत. झी मराठीवरील ‘कानाला खडा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात (चॅट शो) अतुल परचुरे यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे. अभिनेते संजय मोने यांनी परचुरे यांची मुलाखत घेतली होती.

अतुल परचुरे म्हणाले होते, मला असं वाटतं की आपण समोरच्यासाठी काय आहोत, तसंच समोरचा आपल्याला काय समजतो हे आपल्याला कळणं फार महत्त्वाचं असतं. त्यात जर गल्लत झाली तर फार गडबड होऊ शकते. तुम्ही एखाद्याला, समोरच्या व्यक्तीला भयंकर जवळचा मित्र समजता आणि तो तुम्हाला टाईमपास समजतो, तेव्हा फार वाईट वाटतं. उपलब्धता हा जर तुमचा गुण असेल आणि त्याने तुम्हाला फोन केला की तुम्ही त्याच्यासमोर उभे राहता, त्याच्यासाठी उपलब्ध राहता. त्याने तुम्हाला बोलावलेलं असतं कारण तुम्ही काहीतरी मनोरंजक बोलता, छान हसवता. परंतु, ज्यावेळी त्याला कोणाबरोबर वेळ घालवायचा आहे याची निवड करण्याची त्याला संधी असते किंवा त्याच्यावर अशी वेळ येते तेव्हा तो ठरवून दुसऱ्या लोकांना भेटतो, दुसऱ्या लोकांची निवड करतो, त्या लोकांना भेटतो, त्यांच्याबरोबर वेळ घालवतो आणि तुम्हाला जेव्हा त्याला भेटायचं असतं तेव्हा तो तुम्हाला वेळ नाही असं सांगतो, तेव्हा फार वाईट वाटतं. असं वाटतं की आपलं कुठेतरी चुकतंय. त्यामुळे समोरच्यासाठी आपण काय आहोत हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे.

हे ही वाचा >> Atul Parchure : “अतुल परचुरेंच्या चाहत्यांपैकी एक या नात्याने मी…”, एकनाथ शिंदेंची चतुरस्त्र अभिनेत्याला श्रद्धांजली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी कलाविश्वावर शोककळा

कर्करोगावर मात करून अतुल परचुरे यांनी पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. मराठी रंगभूमीवर पुन्हा दाखल झालेल्या सूर्याची पिल्ले या नाटकातही त्यांची भूमिका होती. पण, कर्करोगानंतर त्यांची दुसरी इनिंग दुर्दैवानं फार काळ चालली नाही. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. अष्टपैलू अभिनेता, चांगला मित्र गमावल्याची भावना त्यांच्या सहकलाकारांनी व्यक्त केली आहे.