हॉलिवूडमधील हिट चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘अवतार’ या थ्री डी चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरु आहे. २००९ मध्ये आलेल्या ‘अवतार’ची त्याच्या नावाखाली चित्रपटांची मालिका करण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी योग्य तारीख न मिळाल्यामुळे चित्रीकरण थांबले होते. अखेर, निर्मात्यांना आता योग्य तारीख मिळाली असून, २५ सप्टेंबरपासून चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली.

वाचा : सलमानप्रमाणेच हा मराठमोळा अभिनेताही लग्नापासून काढतोय पळ

‘अवतार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स कॅमेरॉन यांनी केले होते. तेव्हा या चित्रपटाने उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. ग्राफिक्सचा अत्यंत प्रभावी वापर व थ्री डी चित्रीकरण हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. आता ‘अवतार’चा सिक्वल येण्यासाठी सज्ज झाला असून, त्याचा बजेट एक अब्ज डॉलरपेक्षाही अधिक असण्याचा अंदाज आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेम्स हे एकाच वेळी ‘अवतार’च्या चार भागांचे चित्रीकरण करणार आहेत. यापूर्वी पीटर जॅक्सनने ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’च्या तीन भागांचे एकाच वेळी चित्रीकरण केले होते. ‘अवतार’चा दुसरा भाग १८ डिसेंबरला २०२० रोजी तर त्यानंतर एक वर्षाने त्यापुढचा भाग प्रदर्शित केला जाईल. उर्वरित दोन भाग २०२४ आणि डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होतील.

वाचा : शाहरुख- ऐश्वर्यामध्ये असलेला अबोला १४ वर्षांनंतर सुटला

जेम्स कॅमेरॉन हे भव्य चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी ‘टर्मिनेटर २’ आणि ‘टायटॅनिक’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.