|| अनीश प्रभुणे

अकरा वर्षे, एकवीस चित्रपट, तीसपेक्षा जास्त सुपरहिरो आणि अनेक बिलियन डॉलर्स.. चक्रवाढ व्याजासारखे वाढत जाणारे हे आकडे आपल्याला अचंबित करून सोडतात. हे आकडे अविश्वसनीय वाटले तरीही खरे आहेत आणि ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची ही यशोगाथा आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ या चित्रपटाने ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मधील एक महत्त्वाचा टप्पा संपुष्टात आला..

‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाने जितके वेड लावले नसेल आणि जितक्या आतुरतेने ‘बाहुबली’च्या पुढच्या भागाची वाट बघितली गेली नसेल, त्यापेक्षा जास्तच ‘अ‍ॅव्हेंजर्स’चे काय होणार? थानोस मरणार का?’ या आणि इतर अनेक प्रश्नांनी जगभरातील चाहत्यांना भंडावून सोडले होते. त्यामुळेच प्रत्येक बाबतीत नवे विक्रम या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच नोंदविले गेले. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे पुढच्या मंगळवापर्यंत तिकीट उपलब्ध नसणे, चोवीस तास चित्रपटाचे खेळ होणे अशा अनेक नावीन्यपूर्ण घडामोडी या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवायला मिळाल्या. ‘थलैवा’ रजनीकांत किंवा फार तर बाहुबली सोडल्यास कोणाच्याही वाटय़ाला असे काही आल्याचे डोळ्यासमोर येत नाही. विशेषत: भारतात एखाद्या इंग्रजी चित्रपटाच्या वाटय़ाला तर असे भाग्य लाभणे दुर्मीळात दुर्मीळ!

पण शेवटी प्रश्न उरतोच, की चित्रपटात असे काय आहे? ज्यामुळे चित्रपटासाठी प्रेक्षक इतके वेडे झाले आहेत? थोडे इतिहासात डोकावल्यास त्याचे विश्लेषण करता येईल. लहानपणी प्रत्येकालाच आपल्याकडे अदृश्य होणे, उडता येणे, एका बुक्कीत चार भिंती फोडण्यासारखी ताकद असणे अशी अद्भुत शक्ती असावी असे वाटत असते. या गोष्टी घडविता आल्या तर? असे स्टॅन ली नावाच्या एका अवलियाला वाटले. आपल्यातल्याच माणसांना अशा शक्ती देऊन त्यांची नाळ प्रत्येकाशी जोडली तर? या संकल्पनेतूनच माव्‍‌र्हल कॉमिक्सचा जन्म झाला. जवळपास ६० वर्षांपूर्वी स्टॅन लीने वेगवेगळी पात्रे आणि त्यांच्या वेगवेगळ्या शक्तींचं अद्भुत विश्व निर्माण केलं आणि त्यानंतर शब्दश: इतिहास घडला.

गेल्या २० वर्षांच्या कालखंडात, स्पेशल इफेक्ट्सच्या (प्रगत संगणकीय तंत्रज्ञान) साह्य़ाने चित्रपटांमध्ये अनेक अशक्य करामती दाखवणे सहज शक्य झाले. २००८ मध्ये, ‘आयर्न मॅन’पासून माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात झाली. यथावकाश कॉमिक्समधली पात्रे आणि त्यांच्या कहाण्या तब्बल अकरा वर्षे २१ चित्रपटांतून आपल्यासमोर आल्या. आजूबाजूला सुपरमॅन किंवा बॅटमॅन असे तगडे नायक आणि त्यांचे उत्तम चित्रपट असूनही ‘माव्‍‌र्हल’चे चित्रपट एवढे यशस्वी कसे झाले? सध्याच्या काळातील सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाची घटना असा उल्लेख ‘माव्‍‌र्हल’च्याच बाबतीत का होतो?

माव्‍‌र्हलने चित्रपटनिर्मितीमध्ये केलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कॉमिकमधल्या काल्पनिक पात्रांना तुमच्याआमच्यातल्या माणसांच्या छटा दिल्या. अशक्यप्राय शक्ती असलेली किंवा जादू येणारी माव्‍‌र्हलची पात्रे (जरी ती परग्रहवासी आणि माणसांसारखी दिसणारी नसली तरीही) सरतेशेवटी त्यांच्या असण्या-नसण्याचा सारांश, हा मानवी भावनांचा खेळ आहे. आपण आजही पाहतो, एखाद्या गटामध्ये किंवा संघटनेमध्ये तत्त्वनिष्ठ नेता, जगाची फिकीर नाही, परंतु वेळ आल्यास कोणत्याही थराला जाऊन काम फत्ते करणार. थोडे घाबरणारे, काही फक्त वैचारिकदृष्टय़ा सक्षम, तर काही सैनिकी खाक्याचे अशी विविध प्रकारची माणसे आपल्याला पाहायला मिळतात. कॉमिक्स जुने असो वा नवे, माव्‍‌र्हलने आपल्या चित्रपटातील पात्रे आणि कथानक हे कायमच बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वीही झाले.

प्रत्येक संघटनेला आपल्या कामासाठी निश्चित असे ध्येय किंवा उद्दिष्ट गरजेचे असते. ते कसे साध्य करायचे यावरून अंतर्गत वाद होतात, फाटाफूटही होते; पण अंतिमत: एकी हेच बळ हे तत्त्व अनुसरत हेवेदावे विसरून दुष्ट शक्तींच्या नायनाटासाठी सर्व जण एकत्र येतात. मानवी इतिहासात डोकावताना अशी कित्येक उदाहरणे आपल्याला सापडतील. त्याच धर्तीवर माव्‍‌र्हलनेही आपले सुपरहिरो घडवले.

‘कॅप्टन अमेरिका’सारखा तत्त्वनिष्ठ, वेळप्रसंगी कोणत्याही गोष्टीचा त्याग करणारा, नैतिकता जपणारा नेता हा कदाचित आजच्या नैतिकतेचे भान सुटलेल्या राजकीय परिस्थितीत सर्वात आपलासा वाटणारा नेता म्हणता येईल. कोणीही हरवू शकणार नाही अशी अचाट शक्ती असलेला ‘हल्क’ हा आपल्याच शक्तीला घाबरून, गरज असेल तर शांत डोक्याने विचार करणारा आहे. पैसा, तंत्रज्ञान आणि इतर कशाची काही कमी नसलेला ‘टोनी स्टार्क’ही आपली पूर्वाश्रमीची पातके धुऊन काढून केवळ जगासमोर आदर्श निर्माण होण्यासाठी ‘आयर्न मॅन’ होतो. अशी अनेक पात्रे माव्‍‌र्हलमध्ये आपल्याला दिसतात. मानवी संवेदनांच्या अनेक छटा उलगडून एक आदर्श विश्व आपल्यासमोर उभे राहाते. कोणत्याही शक्ती असोत अथवा नसोत, ही सर्व पात्रे आपल्याला (प्रेक्षकांना) सद्य:स्थितीत गरजेच्या असलेल्या आदर्शवादाचे, नीतिमत्तेचे धडे देतात. ही पात्रे शक्तिमान आणि काल्पनिक असतील, परंतु ती आपल्यातील खरी माणसे आहेत असे वाटल्याशिवाय राहात नाही.

सुपरहिरो आणि सुपरपॉवर या कायम वरवरच्या वाटणाऱ्या आणि काल्पनिक असल्याने सहज दुर्लक्षित केलेल्या गोष्टी माव्‍‌र्हलने थेट आपल्या जगण्याशी भिडवून दाखवल्या. पडद्यावरील अवास्तव आणि प्रेक्षकांचे वास्तव यातील रेषा सहजपणे पुसणे हीच माव्‍‌र्हलची खरी सुपरपॉवर. काळाबरोबर चालताना, गेल्या ११ वर्षांत राजकीय आणि सामाजिक पटलावर झालेली स्थित्यंतरे, माव्‍‌र्हलच्या चित्रपटांमध्येही तितक्याच प्रभावीपणे दिसतात. विविध वंश-वर्णाची, पुरुषसत्ताक पद्धती मोडून स्त्रियांचे स्थान उंचावणारी पात्रे माव्‍‌र्हलने आपल्याला दिली. कदाचित या गोष्टींमुळेच, ही सर्व पात्रे आपलीशी वाटतात आणि त्यांच्यामध्ये आपण (प्रेक्षक) आपल्या आजूबाजूच्या सजीव माणसांइतकेच गुंतून जातो. आपल्यातील कॅप्टन अमेरिका, हल्क, आयर्न मॅन आपण आपल्याच नकळत शोधतो, आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जाताना माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधले संवाद आपण नकळत बोलून जातो.

मैत्री, प्रेम, राग, द्वेष, सूडभावना अशा मूळ मानवी भावनांचा पुरेपूर आणि यथायोग्य वापर करून सर्वाची नस अचूक पकडणे हे माव्‍‌र्हलचे यश. गेल्या २१ चित्रपटांत कायम असलेला हा धागा आता २२ व्या ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ या चित्रपटातून एक महत्त्वाचे कथानक संपवतोय. मानवी प्रवृत्ती ही खरी शक्ती मानणारे सुपरहिरो, त्यांची गेल्या अकरा वर्षांची वाटचाल, ही आहे केव्हिन फाईगी या निर्मात्याची दूरदृष्टी. शिगेला पोहोचलेली उत्सुकता, खलनायकाबद्दलही आपुलकी वाटायला लावणारे कथानक, मोक्याच्या क्षणी सर्वाना हतबल करून संपलेला आधीचा भाग या सर्व गोष्टी ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ला चित्रपटांच्या इतिहासात नव्या उंचीवर नेणार यात शंकाच नाही.

अर्थात या सगळ्यात महत्त्वाची आहे ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’मध्ये नक्की काय घडते ही उत्सुकता. चित्रपट न पाहिलेले प्रेक्षक काय घडणार याच्या विवंचनेत आहेत, तर बघितलेल्यांवर कसे सांगू? सांगू की नको? अशी स्थिती येण्याची वेळ पहिल्यांदाच आली असेल. माव्‍‌र्हलने फारच सर्जनशीलतेने या समस्येचा चित्रपटाच्या जाहिरातीसाठी वापर करून घेतला. मुख्य खलनायक थानोसपासून कॅप्टन अमेरिका किंवा आयर्न मॅनसारख्या नायकांचा ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ असे फोटो ट्विटरवर टाकून, (शांत बसा! कोणीही काहीही सांगू नका!) अशी सूचना लिहून ‘स्पॉयलर’ देणाऱ्या प्रेक्षकांना जवळजवळ ताकीद दिली आहे. या चित्रपटात काही महत्त्वाच्या पात्रांचा होणारा मृत्यू हा गेली ११ वर्षे धार्मिक भावनेतून हे चित्रपट पाहणाऱ्या माव्‍‌र्हलच्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक प्रसंग असणार आहे. त्यामुळेच कोण वाचणार, कोण मरणार याविषयी इंटरनेटवर अनेक लोक खरी-खोटी माहिती देत आहेत. ते काही असले, तरीही चित्रपट बघितलेल्यांना त्या धक्क्य़ातून सावरता न येणे आणि बघता न आलेल्यांनी धक्का बसण्याची मानसिक तयारी करणे हे क्रमप्राप्त आहे.

पडद्यावरील चित्रपटातून पडद्यामागे भावनिक गुंतवणूक तयार करणे हे आजवर इतक्या प्रभावीपणे कधीच कोणाला जमले नव्हते आणि नजीकच्या काळात जमेल असेही वाटत नाही. चित्रपटाच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या पर्वाचा अस्त ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’मधून होतोय. हृदयाची धडधड वाढलेल्या सर्व प्रेक्षकांची, शेवटचा दिस गोड व्हावा, हीच माफक अपेक्षा आहे. नाही का?