‘बागी’ मालिकेतील ‘बागी ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या भागामध्ये अभिनेता रितेश देशमुख देखील दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली होती. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘बागी ३’मध्ये अभिनेता रितेश देशमुख (विक्रम) आणि टायगर श्रॉफ (रोनी) भाऊ आहेत. काही कारणास्तव विक्रमला सीरियाला जावे लागते. तिकडे अबू जलाल विक्रमचे अपहरण करतो. त्याला सोडवण्यासाठी टायगर श्रॉफ सर्व सीमा ओलांडतो. या धडपडीमध्ये श्रद्धा रोनीसोबत असते. दरम्यान टायगरची थक्क करणारी शरीरयष्टी आणि साहसदृष्ये विशेष लक्ष वेधून घेतात. तसेच चित्रपटामध्ये अंकिता लोखंडे देखील दिसणार आहे.
‘बागी’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि टायगर मुख्य भूमिकेत होते. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खानने केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागी २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५३ कोटींची कमाई केली होती. या भागात दिशा पटाणी आणि टायगर मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला लाभला. त्यामुळे साहजिकच टायगरच्या आगामी ‘बागी 3’कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पण आता ‘बागी ३’मध्ये पुन्हा श्रद्धा आणि टायगरची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. ‘बागी ३’ हा चित्रपट ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे.