बहुप्रतिक्षित ‘बाहुबली २’ या चित्रपटाशी निगडीत बऱ्याच गोष्टी सध्या चर्चेत आहेत. एस. एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटातील गाणी नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटीमध्ये पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ‘बाहुबली २’च्या ज्युकबॉक्सचे अनावरण करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एम. एम. किरवानी यांनी ‘बाहुबली २’च्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी लिलया पेलली. किरवानी यांनीच या चित्रपटाच्या पहिल्या भागाचेही संगीत दिग्दर्शन केले होते. या संगीत अनावरण सोहळ्यामध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या गाण्यांपैकी एक गाणे म्हणजे ‘साहोर बाहुबली’. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या प्रत्येक मोशन पोस्टरमध्ये ‘साहोर बाहुबली’ची धून आपण ऐकली असेल. ‘बाहुबली २’ या चित्रपटातील गाणे ऐकताना एक ओळखीचा आवाज कानावर पडतो. तो म्हणजे पहाडी आवाजाचे गायक दलेर मेहंदी यांचा. त्यांच्यासोबतच मौनिमा आणि किरवानी यांनीही आपल्या आवाजाची साथ या चित्रपटातील गीतांना दिली आहे. भव्यतेचा गाभा असणाऱ्या या चित्रपटातील काही गीतांना के. शिवशक्ती दत्ता आणि डॉ. के. रामकृष्ण यांनी शब्दबद्ध केले आहे.

‘बाहुबली २’ या चित्रपटातील आणखी एक गाजणारे गाणे म्हणजे ‘हमसा नवा’. चैतन्य प्रसाद लिखित बाहुबली आणि देवसेना म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि प्रभास यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडिया आणि चित्रपटसृष्टीत ‘बाहुबली २’चा हा ज्युकबॉक्स चर्चेचा विषय ठरत असून, सर्वांचेच लक्ष या गाण्यांच्या व्हिडिओकडे लागून राहिले आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या ऑडिओ रिलीजच्या निमित्ताने पार पडलेल्या या सोहळ्याला अभिनेता प्रभास, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, राणा डग्गुबती, सत्यराज, नसर, रम्या कृष्णन या सर्व कलाकारांसह त्यांना एकत्र आणणारे एस.एस. राजामौली यांनी हजेरी लावली होती.

‘बाहुबली- द बिगिनिंग’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता ‘बाहुबली २- द कन्क्लूजन’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना थक्क करण्यासाठी सज्ज झाला आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित या बिग बजेट चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बरेच विक्रम प्रस्थापित केले असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार हे येत्या २८ एप्रिलला कळेलच.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baahubali 2 audio release ss rajamouli films telugu jukebox transcends fans into the world of baahubali
First published on: 27-03-2017 at 11:51 IST