‘बेबी डॉल’ या सुपरहिट गाण्याने रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली गयिका कनिका कपूरला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. ‘रिपब्लिक वर्ल्ड’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार कनिका शुक्रवारी लंडनहून लखनऊला परतली आणि वैद्यकीय तपासणीत तिला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

लखनऊमध्ये चार जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. हे चारही जण करोना पॉझिटिव्ह आहेत. यात कनिकाचाही समावेश आहे.

लखनऊमध्ये कनिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कनिका कपूरने लागण झाल्याची गोष्ट लपवून ठेवली होती. करोनाची लागण झाल्यानंतरही ती एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबली होती. इतकंच नव्हे तर तिने डिनर पार्टीही ठेवली होती, असं म्हटलं जातंय.

कनिका ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे. ‘बेबी डॉल’सोबतच तिने ‘बीट पे बूटी’, ‘टुकुर टुकुर’ ही गाणी गायली आहेत. काही रिअॅलिटी शोमध्ये ती परीक्षक होती.