बाहुबली सिनेमा पाहून बाहेर आल्यानंतर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला होता तो म्हणजे कटप्पाने बाहुबलीला का मारले? याचे उत्तर दुसऱ्या भागात मिळेल असे बाहुबली सिनेमाच्या अखेरीस सांगण्यात आले होते. असे असले तरी सिनेरसिक आपल्यापरीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होते.
आता ‘बाहुबली’चा दुसरा भाग प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली असून त्याचे कथानक सोशल साइट्सवर लीक झाले आहे. पण लीक झालेले हे कथानक खरोखरीच सिनेमाचा भाग आहे अथवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल होणाऱ्या या मॅसेजनुसार, कटप्पा महिष्मति सिंहासनाचा सेवक असतो. फक्त कटप्पाच नाही तर त्याचे पूर्वजही या सिंहासनाचे गुलाम असतात. पुढच्या पिढीत जन्मलेलेही या सिंहासनाचे गुलाम असतीच असे वचन कटप्पाच्या पूर्वजांनी दिले होते. जेव्हा बाहुबली राजा बनतो तेव्हा त्या राज्यात ‘देवसेना’ नावाची राणी असते. बाहुबलीचं त्या राणीवर फार प्रेम असतं.
कथानक इथे वेगळं वळण घेते. भल्लाळदेवाचेही देवसेनेवर प्रेम असतं. राजमातेच्या आदेशानुसार देवसेनेशी लग्न करणाऱ्याला राज्य सोडून जावे लागेल. बाहुबली देवसेनेवरील प्रेमासाठी राज्य सोडून जाण्यास तयार होतो. देवसेनेशी लग्न झाल्यानंतर बाहुबली राज्य सोडून दूर निघून जातो. बाहुबली निघून गेल्यानंतर कालकेयचा मुलगा परत येतो आणि महिष्मती राज्यावर आक्रमण करतो. परत एकदा बाहुबली महिष्मती राज्याला वाचवतो. यात भल्लाळदेवाला भिती असते की राजमाता बाहुबलीला परत राजा बनवेल. या भितीमुळेच भल्लाळदेव कटप्पाला बाहुबलीस मारण्याची आज्ञा देतो. कटप्पा सिंहासनाचा गुलाम असल्यामुळे आणि तेव्हाचा राजा भल्लाळदेव असल्यामुळे त्याच्या आज्ञेचे पालन करणं त्याला भाग होते. या आज्ञेचे पालन करत कटप्पा बाहुबलीला ठार मारतो.
‘बाहुबली’चा पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर याचा दुसरा भाग २८ एप्रिल २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. बाहुबली ईदच्या एक आठवडाआधी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी हा सिनेमा परशुराम जयंतीला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक महत्त्वाचे सिनेमे हे नाताळ, दिवाळी, ईद यांसारख्या दिवसांमध्येच प्रदर्शित होत असतात. ‘बाहुबली’ मात्र याला अपवाद ठरणार आहे.