गायत्री हसबनीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्याबरोबर सगल पाच वर्षांहून अधिक काळ ‘बाहुबली’ चित्रपटासाठी दिल्यानंतर पुढची दोन वर्षे या चित्रपटाच्या यशात प्रभास हे नाव चमकत राहिलं. या चित्रपटाच्या यशाने त्याला बॉलीवूडची वाट खुली केली. किंबहुना, अभिनयाच्या कक्षा दाक्षिणात्य चित्रपटांपलीकडे विस्तारल्या. त्यानंतर केलेला ‘साहो’ फार चालला नाही आणि नंतर करोनामुळे यात खंड पडला. आता या सगळय़ातून बाहेर पडून नवनवे चित्रपट करणाऱ्या प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नायकाच्या भूमिका, प्रेक्षकांचे अमाप प्रेम आणि व्यावसायिक चित्रपटांचे बदलते मापदंड याविषयी त्याने दिलखुलास गप्पा मारल्या..

‘सध्या चित्रपटाकडे उत्पादन या अर्थाने पाहिले तर एक अभिनेता म्हणून मला चित्रपटासाठी काय योग्य आहे याचा विचार करणं आवश्यक वाटतं. ‘राधे श्याम’ या चित्रपटाचे बजेट ४०० कोटी आहे तेव्हा चित्रपटासाठी योग्य ती आर्थिक गणितं जुळावीत यासाठी मी माझे मानधन कमी केले’, असं तो सांगतो. माझा हातभार चित्रपटाच्या निर्मितीसाठी लागेल, पण ‘बाहूबली’नंतर आपले पुढचे चित्रपट प्रेक्षक कशा पध्दतीने स्वीकारतील, हा सवाल कायम माझ्यासमोर असतो, अशी कबुलीही त्याने दिली.

‘मला माझ्यासाठी प्रेक्षक हे खूप आशावादी वाटतात आणि मी करतोय तेही काम मला आवडतं, परंतु आर्थिकदृष्टय़ाही चित्रपटांचा विचार करणं सध्या माझ्यासाठी महत्त्वाचं ठरतं’, असं तो प्रांजळपणे सांगतो. सध्या हिंदी, दाक्षिणात्य, गुजराती चित्रपट अशी विभागणी धूसर होत चालली आहे, याबद्दल त्याला विचारलं असता आज आपण भारतीय चित्रपट असे म्हणतो आहोत, पण हे म्हणायला फारच उशीर झाला, असं तो म्हणतो. आपली चित्रपटसृष्टी शंभर वर्षे जुनी आहे. आता कुठे प्रादेशिक तसेच हिंदी चित्रपटांना आता प्रेक्षक एकसारखे पसंत करू लागले आहेत. जगात भारतीय चित्रपटांचे स्थान अधिकाधिक दृढ होते आहे जी गोष्ट सुखावणारी आहे, अशी भावनाही प्रभासने यावेळी व्यक्त केली. 

‘राधे श्याम’ला सध्या प्रेक्षकांची वाहवा मिळत असून समीक्षकांकडूनही संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘साहो’च्या वेळी बजेटच्या दुप्पट त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. ‘राधे श्याम’ची गणितं कशी असतील याचा विचार प्रभासने कधी केला नाही असं त्याने सांगितलं. ‘राधे श्याम’ हा आपला बहुचर्चित चित्रपट त्याच्या करिअरच्या दृष्टीने आणि खासकरून टाळेबंदीनंतर येणारा प्रभासचा हा पहिलाच चित्रपट म्हणून त्याच्याकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. त्यातून आपल्याच आजूबाजूला ‘पुष्पा’सारखे प्रादेशिक चित्रपट हिंदीलाही टक्कर देत असताना तिकीटबारीवरील रणधुमाळीची चिंता सध्या प्रभासला सतावते आहे का? यावर तो म्हणतो, ‘‘स्पर्धा ही कुठे नसते? ती सगळीकडेच असते. ‘पुष्पा’बद्दल सांगायचे झाले तर अल्लू अर्जुनने त्या चित्रपटाला त्याच्या अभिनयातून शंभर टक्के न्याय दिला आहे ज्यासाठी मीही त्याचे कौतुकच करेन. ‘बाहुबली’ हा चित्रपटसुद्धा यशाच्या शिखरावर हळूहळू चढत पोहोचला होता. यशाचे शिखर गाठण्यासाठी त्याला वेळही लागला, माझ्यासाठी यशापयशाची गणितं ही काळाप्रमाणे अधिक स्पष्ट होतात’’, अशी भावना त्याने व्यक्त केली.

‘‘हिंदी तसेच प्रादेशिक चित्रपटांमध्ये कौंटुबिक विषय, प्रेमकथा, वास्तवदर्शी कथा ते अगदी व्यावसायिक मसाला अशा अनेक आशयांचा मामला असतो. त्यातूनही विविध कथा या प्रेक्षकांसमोर येत असतात. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना नेमके कोणते चित्रपट जास्त आवडतात हे एक अभिनेता म्हणून मी ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे आपलं करत पुढे जाणं हे मला सर्वोतोपरी योग्य वाटतं, असं तो म्हणतो. आताचा प्रेक्षक हा सजग, सुजाण आहे. आपले चाहते हुशार आहेत .कोणता चित्रपट योग्य आणि कोणता अयोग्य हे ते ठरवू शकतात आणि त्यांनाच ते ठरवायचा अधिकार आहे. अमुक एक चित्रपट दक्षिणेत हिट ठरेल तोच मुंबईत होणार नाही किंवा त्याच्या उलटही होऊ शकते. ‘साहो’च्या बाबतीतही हेच झाले. दक्षिणेत तो लोकांना प्रचंड भावला. त्यामुळे प्रत्यक्ष चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत असे कुठलेही ठोकताळे बांधणे कठीण असते, असं तो म्हणतो.

‘बाहुबली’च्या अमाप यशानंतर प्रभासला ‘साहो’, ‘राधे श्याम’, ‘आदिपुरूष’ असे अनेक भाषांमधून राष्ट्रीय पातळीवर तयार झालेल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. वेगवेगळय़ा हिंदी अभिनेत्रींबरोबर तो सध्या काम करतो आहे. ‘साहो’मध्ये श्रद्धा कपूर असो वा ‘राधे श्याम’ या चित्रपटातील आपली सहअभिनेत्री पूजा हेगडे असो, ओम राऊत दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’मध्ये त्याने क्रिती सननबरोबर काम केले आहे. या सगळय़ांबरोबर काम करणं हा आनंददायी अनुभव होता असे सांगणारा प्रभास हा बॉलीवूड नायकाच्या तोडीस तोड कलाकार म्हणून सध्या ओळखला जातो. ‘आदिपुरुष’ या भव्यदिव्य चित्रपटातून तो बॉलीवूडमध्ये नायक म्हणून अधिकृतपणे पदार्पण करतो आहे. त्याविषयीही तो खूप उत्सुक असल्याचे सांगतो. हिंदीत राजकुमार हिरानी आपले सर्वात आवडते दिग्दर्शक असल्याचे त्याने यावेळी सांगितले आणि अद्याप तरी त्यांच्याकडून आपल्यासाठी कोणती कथा आलेली नाही, मात्र तशी काही संधी आल्यास ती अजिबात दवडणार नाही, असेही त्याने सांगितले.

लग्नासाठी पाच हजार प्रस्ताव?

‘बाहुबली’नंतर प्रभासला पाच हजारहून अधिक लग्नाचे प्रस्ताव मुलींकडून आले होते. त्यावर बोलताना आजही असं जेव्हा होतं तेव्हा मी गोंधळून जातो, असं प्रभास म्हणतो. लग्नासाठी कमी प्रस्ताव आले काय जास्त आले काय.. एकप्रकारे ती समस्याच आहे. त्यावर काही बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं.. असं मिश्कील उत्तर देत या प्रश्नाला त्याने नेहमीप्रमाणे बगल दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bahubali superstar prabhas new film success movie marriage proposal ysh
First published on: 13-03-2022 at 00:02 IST