दक्षिण भारतातील सिनेमावेडय़ांची दुनिया अजब-गजब असते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. अशाच एका सिनेमावेडय़ा कलावंताच्या कल्पनाभरारीने अत्युच्च शिखर गाठावे असा भव्य, नेत्रसुखद, प्रभावी आणि नितांतसुंदर चित्रपट ‘बाहुबली दी बीगिनिंग’द्वारे सादर केला आहे. अप्रतिम कम्प्युटर ग्राफिक्सनी बनविलेला चित्रपट गोष्टीच्या सादरीकरणातही तितकाच प्रभावी ठरला आहे. चित्रपटाच्या नावातच दुसऱ्या भागाचे सूचन केले असून हा चित्रपट पाहिल्यानंतर दुसऱ्या भागाची उत्सुकता निर्माण न होईल तरच नवल!
भारतात चित्रपटाचे आगमन झाले तेव्हा निर्माते-दिग्दर्शकांनी सगळ्यात आधी समस्त भारतीयांच्या जनमानसात रुजलेल्या भारतीय पौराणिक कथाच पडद्यावर साकारल्या होत्या. ‘बाहुबली दी बीगिनिंग’ या चित्रपटातही राजे, राजवाडे, युद्ध अशाच पद्धतीचे पौराणिक कथानक साकारते. चित्रपटाच्या सुरुवातीच्याच दृश्यात दिसणारे मन मोहून टाकणारे धबधबे, हिमालयाचा आभास निर्माण करण्यात यशस्वी होतात. प्रेम, विश्वासघात, दु:ख, शौर्य-पराक्रम, भावाभावांतील स्पर्धा आणि वैमनस्य, स्त्री सौंदर्याची रूपं, वीररसाचा उत्तम आविष्कार अशा सगळ्या गोष्टी या चित्रपटात आहेत. गोष्ट सांगण्याची कला दिग्दर्शकाला उत्तम साधली आहे हे निश्चित.
शिवा हा चित्रपटाचा नायक आहे. त्याला लहानपणापासून उंच पर्वतराजीतील धबधबे ओलांडून पलीकडे उंचावर जाण्याची आस असते. कदाचित त्याला भव्य शिखरांच्या पलीकडची राजधानी आणि तिथले ऐश्वर्य खुणावत असावे. अनेकदा तो जलपर्वत चढण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा धडपडतो. अखेर एकदा तो यशस्वीरीत्या जलपर्वत चढतो आणि त्याला अवंतिका भेटते. अवंतिकामुळेच शिवा जलपर्वत पार करून निराळ्या विश्वात पोहोचतो. अवंतिका-शिवा यांचे प्रेम फुलते. अवंतिकाची महत्त्वाकांक्षा आणि ध्येय हेच शिवाचे ध्येय बनते. तेच त्याचे भागधेय ठरते. अवंतिकाला माहेश्मती साम्राज्याची राणी देवसेना जिला भल्लालदेव या क्रूरकर्माने २५ वर्षे कैद करून ठेवले आहे तिला सोडवायचे असते. देवसेना राणीला सोडवून आणण्याचे वचन शिवा अवंतिकाला देतो. शिवा हाच बाहुबली असल्याचे समजेपर्यंत सगळा चित्रपट एकामागून वेगवान, नेत्रसुखद दृश्यांनी प्रेक्षकाला खिळवून ठेवतो.
दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना पौराणिक कथांनी भुरळ घातली आहे. परंतु या पौराणिक कथांच्या पायावर त्यांनी रचलेला भव्य, नितांतसुंदर चित्रपट आणि चित्रपटाचे सगळे तंत्रविषयक ज्ञान या चित्रपटात पणाला लावले आहे. त्यामुळे अर्थातच प्रेक्षकांना या चित्रपटाची भुरळ घालण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले आहेत.
शिवाच्या भूमिकेतील प्रभास, अवंतिकाच्या भूमिकेतील तमन्ना भाटिया, कटप्पाच्या भूूमिकेतील सत्यराज, भल्लालदेवच्या भूमिकेतील राणा दग्गुबाती अशा सर्व प्रमुख भूमिकांमधील कलावंतांनी उत्तम अभिनयाचे दर्शन घडविले आहे.
सेट डिझाइन, संगीत, अप्रतिम छायालेखन, संकलन, अभिनय, कम्प्युटर ग्राफिक्स अशा सर्व तांत्रिक बाजू उत्तम असलेला हा चित्रपट गोष्ट आणि सादरीकरण दोन्ही प्रेक्षकाला भिडल्यामुळे निखळ करमणूक करण्यात कमालीचा यशस्वी ठरतो.
बाहुबली दी बीगिनिंग
निर्माते – शोबू यरलागड्डा, प्रसाद देविनेनी
दिग्दर्शक – एस. एस. राजामौली
पटकथा – एस. एस. राजामौली, राहुल कोडा, मधन कार्की, विजयेंद्र प्रसाद
कथा – व्ही. विजयेंद्र प्रसाद
छायालेखन – के. के. सेंथिल कुमार
संगीत – एम. एम. कीरावाणी
कलावंत – प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, नासीर, सुदीप, सत्यराज, प्रभाकर, सुब्बराया सर्मा व अन्य.