‘शोले’मध्ये गब्बरच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्याला होती पहिली पसंती

चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला होता

Amjaz Khan, Amjad khan Birthday , Bollywood, sholey,
'शोले' चित्रपटात अमजद खान यांनी गब्बरची भूमिका साकारली आहे.

आजही बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका म्हटले की दिवंगत अभिनेते अमजद खान डोळ्यासमोर उभे राहतात. अभिनेते अमजद खान हे खलनायकाच्या भूमिकांसाठी जास्त लोकप्रिय होते. मात्र अमजद खान यांना इंडस्ट्रीमधील खलनायक म्हटल्यावर राग येत असल्याचे म्हटले जाते. अमजद खान यांचा बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रवास अतिशय अविस्मरणीय होता. या खलनायकाने २७ जुलै १९९२ साली जगाचा निरोप घेतला.

अमजद यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४० रोजी झाला होता. अमजद खान हे मुंबई यूनिवर्सिटीचे टॉपर असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांना हिंदी, उर्दू आणि पर्शियन भाषांचे खूप ज्ञान होते. त्यांचा मुलगा शादाब खानने एका मुलाखतीमध्ये अमजद हे मुंबई यूनिवर्सिटीमधील पर्शियन भाषेचे टॉपर असल्याचे म्हटले होते.

अमजद खान यांच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यातील आजही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणारा आणि सर्वांचा आवडता चित्रपट म्हणजे ‘शोले.’ या चित्रपटात अमजद यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांची गब्बर सिंह ही खलनायकाची भूमिका नायकांपेक्षाही जास्त चर्चेत होती. या चित्रपटाने त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ चित्रपटातील गब्बरचे डायलॉग आजही लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. पण याच गब्बरच्या भूमिकेसाठी सुरुवातीला अमजद खान यांच्या ऐवजी दुसऱ्या अभिनेत्याला पसंती देण्यात आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला होता.

गब्बर सिंह या भूमिकेसाठी सुरुवातीला अभिनेता डॅनी डेंग्जोग्पाची निवड करण्यात आली होती. डॅनी यांनी या भूमिकेसाठी होकारही कळवला होता. पण डॅनी त्यावेळी फिरोज खान यांचा बिग बजेट चित्रपट ‘धर्मात्मा’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होते. त्यामुळे दोन्ही चित्रपटांना वेळ देणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून नंतर आम्ही अमजद खान यांची निवड केली असल्याचा खुलासा सिप्पी यांनी केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Before amjat khan this bollywood actor was firstly selected for sholey movie avb