कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी देवाचा आशिर्वाद घेणं नेहमीच चांगलं मानलं जातं. याच कारणामुळे ‘केदारनाथ’ चित्रपटाची टीमसुद्धा उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. ३ सप्टेंबरपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शूटिंगपूर्वी देवदर्शन करण्याचा निर्णय अभिनेता सुशांत सिंग राजपूत, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी घेतला. सोशल मीडियावर फॅन पेजेसच्या अकाऊंटवर दर्शनानंतरचे त्यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

मंदिरातून बाहेर पडतानाचे तसेच, तिथल्या साधूसोबत सुशांत हात जोडून उभा असल्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. साराची ही दुसरी केदारनाथ यात्रा आहे. दोन महिन्यांपूर्वी ती दिग्दर्शक अभिषेक कपूरसोबत केदारनाथ दर्शनाला गेली होती. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. बाबा सैफ अली खान आणि आई अमृता सिंग यांच्या पावलांवर पाऊल ठेवत तिनेही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतलाय.

वाचा : असा साजरा करणार अक्षय कुमार त्याचा ५० वा वाढदिवस

‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या बहुतांश भागाचं शूटिंग उत्तराखंडमध्येच होणार आहे. शूटिंगपूर्वीही सारा आणि सुशांतने बरीच तयारी केली. नुकतेच हे दोघं या चित्रपटाची संहिता वाचण्यासाठी एकत्र भेटले होते. २०१३ मध्ये उत्तराखंड येथे आलेला पूर, पुरामुळे तेथे निर्माण झालेली परिस्थिती यावर ‘केदारनाथ’ हा चित्रपट आधारित असल्याची सूत्रांची माहिती आहे.