विद्या बालनची मुख्य भूमिका असलेला ‘बेगम जान’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. पण तुम्हाला माहित आहे का, अभिनेत्री रितूपर्णा सेनगुप्ताचा बंगाली सिनेमा ‘राजकाहिनी’चे ‘बेगम जान’ हे हिंदी व्हर्जन आहे. २०१५ मध्ये आलेला ‘राजकाहिनी’चा ट्रेलर आणि बेगम जानच्या ट्रेलरमध्ये फार साम्य आहे. त्यामुळे बंगाली कलाकारांऐवजी हिंदी कलाकारांना घेऊन हा सिनेमा बनवला आहे असेच वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘राजकाहिनी’मध्ये रितूपर्णाची मुख्य भूमिका होती. आतापर्यंत रितूपर्णाची, तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत साधारण चालणारे सिनेमेचे केले अशी ओळख बनली होती. पण प्रत्येक कलाकारासाठी अशी एक तरी भूमिका असते जी त्याला स्टार बनवून जाते तशी रितूपर्णासाठी ‘राजकाहिनी’मधली भूमिका ठरली. श्रीजित मुखर्जी याने दोन्ही बंगाली आणि हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ‘राजकाहिनी’ या सिनेमामुळे रितूपर्णाची ओळख सर्वसामान्य अभिनेत्री ते हरहुन्नरी अभिनेत्री अशी झाली.

विद्या बालनने ‘डर्टी पिक्चर’ या सिनेमानंतर ‘भूल भुल्लैया’ आणि ‘कहानी’ या सिनेमातून आपल्या अभिनयाची ताकद सर्वांना दाखवली. त्यामुळेच जेव्हा तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा कोणालाही आश्चर्य वाटले नाही. त्यामुळेच श्रीजित मुखर्जीने जेव्हा तिला ‘बेगम जान’साठी विचारले तेव्हा या सिनेमातूनही तिचा दमदार अभिनय पुन्हा पाहायला मिळणार हे सर्वांनीच गृहितच धरले.

‘राजकाहिनी’मध्ये प्रफुल्लो आणि इलियास या व्यक्तिरेखा साकारणारे सास्वत चॅटर्जी आणि कौषिक सेन यांच्या भूमिका कोणाला द्यायच्या हा सर्वात मोठा प्रश्न होता. या व्यक्तिरेखेसाठी तशाच तोडीच्या अभिनेत्यांची गरज होती, तेव्हा ‘बेगम जान’मध्ये आशिष विद्यार्थी आणि रजित कपूर यांची नावे पुढे आली. आशिष विद्यार्थी आणि रजित कपूर यांनीही त्यांची भूमिका चोख बजावली आहे. ट्रेलरमध्ये जरी त्यांची झलक फार कमी वेळेसाठी दिसली असली तरी त्यांच्या अभिनयाची किमया सर्वांनाच माहित आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने बेगम जानच्या ट्रेलरची सुरुवात होत असून, या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर एक वेगळा काळ उभा करण्यात आला आहे. असे असले तरी, ‘राजकाहिनी’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ‘भारत भाग्य विधाता’ या गाण्याने ट्रेलरमध्ये अजून रंजकता आली होती. रविद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले हे राष्ट्रगीत ‘बेगम जान’मध्येही पाहायला मिळणार आहे की नाही याबद्दल सध्यातरी काही सांगता येत नाही. पण श्रीजितने हे गाणे हिंदी व्हर्जनमध्येही घ्यावे असेच ‘राजकाहिनी’च्या प्रेक्षकांना पर्यायाने ‘बेगम जान’च्या चाहत्यांना वाटते. हो ना?

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Begum jaan vidya balan rituparno sengupta rajkahini
First published on: 14-03-2017 at 23:03 IST