अभिनेता सलमान खानचा यंदाचा वाढदिवस खुप खास आहे. भाईजानच्या या ५१ व्या वाढदिवसा दिवशी त्याच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. असे असतानाच सलमान खानच्या ‘बिइंग ह्युमन’ या ब्रॅण्डतर्फे फॅशन ज्वेलरीचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सलमान चाहत्यांसाठी एक प्रकारचे रिटर्न गिफ्टच घेऊन आला आहे असेच म्हणावे लागेल. याशिवाय सलमानने नावारुपास आणलेल्या ‘बिइंग ह्युमन’ या ब्रॅण्डच्या दुकानांमध्येही आज पूर्णपणे ५१ टक्क्यांची घसघशीत सवलतही देण्यात येणार आहे. त्यामुळे आज या दुकानांमध्ये गर्दी होणार असेच दिसतेय.

सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या ‘बिइंग ह्युमन’च्या या खास ज्वेलरीसाठी ‘द सलमान खान फाऊंडेशन’ आणि ‘कोशंट ज्वेलरी प्राइवेट लिमिटेड’ यांनी एकत्र येत ही ज्वेलरी बाजारात आणली आहे. ‘बिइंग ह्युमन हा एक दर्जेदार ब्रॅण्ड आहे. त्यामुळे या ब्रॅण्डचा एका वेगळ्या पद्धतीने आम्ही विस्तार करत आहोत. चाहत्यांनी आजवर नेहमीच ‘बिइंग ह्युमन’ला आणि मला खूपच प्रेम दिले आहे. मी अशी आशा करतो की, येणाऱ्या दिवसांमध्येही त्यांचे प्रेम आणि पाठिंबा आम्हाला असाच मिळत राहो’, असे वक्तव्य सलमानने या नव्या ब्रॅण्डविषयी बोलताना केले.

दरम्यान, नव्याने अनावरण होत असलेल्या या ज्वेलरीची संकल्पना सलमानचे हटके स्टाईल स्टेटमेंट आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॅशनमध्ये होणारे बदल या सर्वांच्या निरिक्षणानंतरच ठरविण्यात आले आहे. या नव्या ज्वेलरीमध्ये ६५ टक्के डिझाईन्स महिलांच्या अनुशंगाने बनविण्यात आल्या आहेत. तर, ३५ टक्के डिझाईन्स पुरुषांच्या अनुशंगाने बनविण्यात आले आहेत. अंगठी, कर्णफुले, नेकपिस, ब्रेसलेट अशा विविध रुपांमध्ये असणाऱ्या या ज्वेलरीची किंमत १५० ते ३००० रुपयांपर्यंत असून या ज्वेलरीचे डिझाईन्स १५ ते २५ या वयोगटाला नजरेत ठेवून करण्यात आले आहे.

‘आम्ही काही वर्षांपासून सलमानसोबत काम करत आहोत. सलमान खान आधुनिक दिवसांतील पिढीचे प्रतिनित्त्व करतो. त्यासोबतच त्याचा चाहतावर्गही अफाट आहे. त्यामुळे सलमानच्या असण्याने या ब्रॅण्डलाही नक्कीच मदत होणार आहे’, असे मत स्टाईल कोशंट ज्वेलरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक प्रसाद कापरे यांनी मांडले आहे. त्यामुळे भाईजानचा हा वाढदिवस त्याच्या चाहत्यांच्या जीवनातही आनंदाचे क्षण घेऊन आला आहे असेच दिसतेय.