‘सुरूवात’ या सोळा मिनिटांच्या लघूपटाला दक्षिण आफ्रिकेत सर्वोत्कृष्ट लघूपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे, हा लघूपटाचे दिग्दर्शन केले आहे सुरेश शेलार या एका बेस्ट कर्मचाऱयाने.
‘सुरूवात’ शिर्षकाच्या या लघूपटात प्रतीक्षेमुळे होणाऱया वेदना आणि जीवनाचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही गोष्टी एक नवखा कलाकार ६५ वर्षीय ज्येष्ठ कलावंताला अभिनय क्षेत्रात परत येण्यासाठीचे कसे प्रोत्साहन देतो या कथेतून मांडण्यात आल्या आहेत.
याआधीही सुरेश शेलार यांनी पाच लघूपट बनविले आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या लघूपटाला पुरस्कार मिळाला नव्हता. पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच शेलार मिश्कल हास्य करत म्हणतात, “दररोज पाच वाजल्यानंतर मी दिग्दर्शक बनतो.” शेलार बेस्टमध्ये चौथ्या श्रेणीतील कर्मचारी आहेत. संध्याकाळी पाच वाजता कामवारून सुटल्यावर विविध विषयांना घेऊन लघूपट तयार करण्यात त्यांचा उर्वरित वेळ जातो. २००९ सालापासून ‘सुरूवात’ हा त्यांचा आतापर्यंतचा पाचवा लघूपट आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये मामी चित्रपट महोत्सवात शेलार यांच्या लघूपट इतर १२ आंतरराष्ट्रीय लघूपटांसोबत सादर करण्यात आला होता.
महत्वाची गोष्ट म्हणजे, “१९९६ साली स्क्रिन पुरस्कार सोहळा पाहण्यास गेलो असता कलाकारांना मिळणारे पुरस्कार पाहून, मनात आपणही काहीतरी करावे अशी चुणूक लागून गेली आणि त्यावेळी मी ठरविले दिग्दर्शक व्हायचे. त्यानुसार मी आजपर्यंत लघूपटांचे दिग्दर्शन करत आलो. कधी ना कधी माझ्या मेहनतीचे फळ मला मिळेल याचा विश्वास मला होता आणि या पुरस्काराने ते सिद्ध केले.” असेही शेलार म्हणाले.