‘रईस’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सध्या किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. या आगामी चित्रपटातील संवाद, शाहरुखचा लूक आणि एकंदर या चित्रपटाचे कथानक पाहता सध्या चाहत्यांमध्येही ‘रईस’साठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘रईस’ या चित्रपटाचे विविध मार्गांनी प्रमोशन करणाऱ्या शाहरुख खान आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ‘रईस’ या चित्रपटाबद्दल आणि चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या कारकिर्दीबद्दल शाहरुखने मनमोकळ्या गप्पा मारल्या. रईसच्या डोळ्यात सुरमा भरलेल्या निराळ्या लूकपासून ते अगदी या चित्रपटातील सर्वात आव्हानात्मक दृश्याच्या चित्रिकरणाचा किस्सा शाहरुखने या संवादादरम्यान उलगडला. याचवेळी जेव्हा शाहरुखला त्याच्या आणि सलमानच्या बिघडलेल्या नात्याविषयी विचारण्यात आले त्यावेळी त्याने आमच्यात कोणतेच भांडण, वाद नव्हता असे स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘खरंतर सलमानसोबत आणि इतर कोणत्याही कलाकारासोबत माझे कोणत्याच प्रकारचे वाद नाहीत’, असे शाहरुखने स्पष्ट केले. याविषयी सांगताना पुढे शाहरुख म्हणाला, ‘त्या दिवशी रात्री ट्युबलाइट चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी मी सलमानसोबत बसलो होतो त्यावेळी आम्ही याच विषयी बोलत होतो आणि आम्हाला अक्षरश: आमचीच लाज वाट होती की, इतर लोकांना वाटू लागलेले की आमच्यात काहीतरी मोठे भांडण झाले आहे. खरंतर असं काही झालंच नव्हतं. सहसा कलाकारांच्या बाबतीत हे असं होतंच. सलमान आणि माझ्यात भांडण वगैरे काही झाले नव्हते. आमच्यात काही मतभेद होते जे आजही आहे. पण, आमच्या नात्यात आम्ही एकमेकांचा तेवढाच आदर करतो. आयुष्यात तुम्हाला इतक्या गोष्टी मिळाल्या आहेत की, या सर्व चर्चांकडे लक्ष देण्याचे कारणंच नाहीये. मतभेद, एखाद्याविषयीच्या आवडीनिवडी हे सर्व काही स्वाभाविक असल्यामुळे या घटकांसह जगायला शिकले पाहिजे. सलमान आणि माझ्याविषयी बोलायचं झालं तर आमच्या कधीच काही वाद झाले नाहीत’.

वाचा: ‘रईस’च्या निमित्ताने शाहरुखची खास मुलाखत 

प्रसारमाध्यमांसोबत बोलताना शाहरुखने बऱ्याच गोष्टीवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘एक कलाकार होण्याचा मार्ग माझा मी निवडला होता. कलाकार झाल्यानंतर तुमचं आयुष्य काही प्रमाणात इतरांच्या हाती जातं हे विसरुन चालणार नाही. तुम्हाला स्वत:वर संयम ठेवता आला पाहिजे. माझ्या घराजवळ येऊन चाहत्यांनी मला शुभेच्छा देणं ही बाब मला फार आवडते. पण, त्याचवेळी काहीजण माझ्यासाठी काही वाईट शब्दही वापरणार हे तर स्वाभाविक आहे. एका गोष्टीचा स्विकार करुन तुम्ही दुसरी गोष्ट नाकारु शकत नाही’, असे म्हणत शाहरुखने सर्वांचे लक्ष वेधले. ‘काबिल’ आणि ‘रईस’ या दोन्ही चित्रपटांच्या एकाच दिवशी प्रदर्शित होण्याविषयी विचारले असता शाहरुखनेही त्याचे मत मांडले आहे. ‘दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले तर नक्कीच चित्रपटांच्या कमाईवर त्याचा परिणाम होणार. पण, तरीही मी त्यांना आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देतो’, असे म्हणतच त्याने हेही स्पष्ट केले की जर असे झाले नसते तर जास्त चांगले झाले असते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Between salman and me there is disagreement in our opinions but not a fight shah rukh khan
First published on: 19-01-2017 at 03:45 IST