महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जीवनाचा पूर्वार्ध भाई : व्यक्ती की वल्ली या चित्रपटातून अनुभवल्यानंतर उत्तरार्धात त्यांच्या अजून काही घटनांचा आलेख पाहायला मिळणार आहे. मात्र या घटनांतून भाईंच्या व्यक्तित्वाचा वेध घेण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न अपयशी ठरतो. पुलंच्या आयुष्यातील काही घटना, प्रसंग वगळता कथा फारशी पुढे सरकत नाही. पहिल्या भागातील काही प्रसंगांवर जे प्रश्न उपस्थित झाले त्यांची उत्तरे या भागातही मिळत नाहीत.

पूर्वार्धात पुलंच्या लहानपणापासून ते नाटकातील काही प्रवास आणि वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी पाहायला मिळाल्या. काहीसे प्रसंग अर्धवट वाटले. उत्तरार्धातही काही घटनांची जोडणी केली असून कथा मात्र संथ गतीने पुढे जाते. उत्तरार्धात भाईंच्या दूरदर्शनाच्या कामापासून त्यांच्या राजीनाम्यापर्यंत आणि मराठी रंगभूमीवरील काही प्रसिद्ध नाटकं, तसेच या प्रवासात सुनिताबाईंनी भाईंना दिलेली साथ आणि त्याचवेळी रसिकांच्या मनावर राज्य करणारे भाई , आनंदवन, मुक्तांगण अश्या समाजपोयोगी गोष्टींना सढळ हस्ताने मदत करणारे भाई, आणि आणीबाणीच्या काळात न डगमगता विचारस्वातंत्र्यांचा पुरस्कार करणारे भाई हे पैलू पाहायला मिळतात.

पूर्वार्ध संपताना कुमार गंधर्व, भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे आणि पेटीवर दस्तुरखुद्द भाईंची बोटं फिरत असताना आणि त्या सुरेल मैफिलीचा आस्वाद घेताना पूर्वार्ध संपतो. तर उत्तरार्धात ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ हे गाणं आणि दिग्गजांची पुन्हा एकदा रंगलेली मैफल पाहायला मिळते. पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध काहीसा रंजक वाटतो. वृध्दापकाळातील विजय केंकरे आणि शुभांगी दामले यांनी साकारलेली भाई आणि सुनिताबाईंची पात्रेही तितकीच सुंदर झाली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाईंचे जीवनसार दाखवताना त्यांच्या आयुष्यभरातील घटना एकत्र करून दाखवल्या गेल्या. पण त्यातूनही पुलंचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे उलगडत नाही. एकंदरीत दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा हा प्रयत्नही तितकासा यशस्वी ठरला नाही असं म्हणता येईल