अभिनेते भरत जाधव यांचे वडील गणपत हरी जाधव (वय ८७) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी कोल्हापूर येथे निधन झाले. मुंबई येथे अनेक वर्षे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून त्यांनी काम केले होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आठ दिवसांपूर्वीच ते मुंबई येथून कोल्हापुरातील साने गुरूजी वसाहत येथील निवासस्थानी आले होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, किरण, हरिभाऊ आणि अभिनेते भरत ही तीन मुलं आणि एक मुलगी, सुना, नातवंडे,  असा परिवार आहे. शनिवार दि. २३ रोजी पंचगंगा स्मशानभूमी येथे सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी सकाळी दहा वाजता सानेगुरूजी येथील काशिद कॉलनी येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.