चित्रपटसृष्टीच्या मायानगरीत निर्माता हाच मोठा मासा नसून अनेक बडे कलाकार ती भूमिका पार पाडत असतात. नवख्या निर्मात्यांचा घास घेण्याचे कसब या कलाकारांच्या अंगी असून सध्या भरत जाधव करत असलेला फसवणुकीचा दावा फोल आहे, असे स्पष्टीकरण ‘शिवाजी-द रियल हीरो’चे निर्माते सदाशिव पाटील यांनी केले. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भरत जाधव यांनी अनेक अडथळे आणले. त्याचबरोबर जाधव यांच्यासह झालेल्या करारामध्ये डबिंगचा आणि ‘ना हरकती’चा मुद्दा निकालात निघाला होता, असेही त्यांनी सांगितले. या प्रश्नाला ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम वाचा फोडली होती.
‘शिवाजी- द रियल हीरो’ या चित्रपटाचे नियोजन सप्टेंबर २०११ मध्ये सुरू झाले. त्याच वेळी आम्ही भरत जाधव यांच्याशी बोलणी केली होती. चित्रपटात मध्यवर्ती भूमिका शिवाजी या पात्राची असून त्याच्याहून थोडी कमी महत्त्वाची भूमिका पोलीस अधिकाऱ्याची आहे, हे आम्ही त्यांना सांगितले होते. शिवाजीच्या भूमिकेत मारधाड प्रसंग खूप असल्याने त्यांनीच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेची निवड केली, असे पाटील म्हणाले.
सप्टेंबर २०११ मध्ये बोलणी झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये लगेचच जाधव यांच्यासह करार करण्यात आला. यात चित्रपट प्रदर्शनाचे हक्क, डबिंगचे हक्क आणि कलाकारांची ना हरकत, याचा स्पष्ट उल्लेख होता. त्या करारावर जाधव यांच्या सह्य़ाही आहेत, असे पाटील म्हणाले. प्रत्यक्ष चित्रीकरणासाठी जाधव यांचे चार दिवस आम्ही घेतले होते. त्या वेळी पहिल्या दिवशीचे चित्रीकरण सुरळीत पार पडले. मात्र दुसऱ्याच दिवशी जाधव यांनी अडथळे आणण्यास सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी तर जाधव व्हॅनिटी व्हॅनमध्येच बसून राहिले आणि माझ्यासह दिग्दर्शकाला बोलावून घेत अनेक बदल सुचवण्यास त्यांनी सुरुवात केली. आम्ही त्यांच्या हातापाया पडून कसेबसे त्यांच्याकडून दोन प्रसंग चित्रित करून घेतले. मग ‘मूड’ नाही असे सांगत जाधव यांनी चित्रीकरण थांबवले. त्यानंतर चौथ्या दिवशी ते आलेच नाहीत, अशी माहिती पाटील यांनी दिली.
आपण जाधव यांच्याकडे विचारणा करण्यासाठी गेलो असता त्यांनी अक्षरश: अद्वातद्वा बोलत आता या चित्रपटाशी संबंध नसल्याचे सांगितले. तसेच तीन दिवसांचे पैसे द्यावे आणि आपल्याला मोकळे करावे, असे जाधव यांनी सांगितल्याचे पाटील म्हणाले. जाधव यांच्याकडून आपल्यासारख्या छोटय़ा निर्मात्याला मिळालेली वागणूक प्रशस्त नव्हती. त्यात त्यांनी केलेले आरोप तद्दन खोटे आहेत. आपल्याकडे त्याबाबत कागदपत्रेही आहेत, असे पाटील म्हणाले.

छोटय़ा निर्मात्यांनी करायचे काय?
हा चित्रपट बनविण्यासाठी मी माझी जमीन गहाण टाकली होती, कर्ज काढले होते. मात्र भरत जाधव यांच्यासारख्या बडय़ा कलाकाराकडून मिळालेली वागणूक पाहून मी हतबल झालो आहे. चित्रपटसृष्टीतील हे मोठे मासे आमच्यासारख्या लहान माशांचा घास घेत असतील, तर छोटय़ा निर्मात्यांना शेतकऱ्यांसारखाच आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही.  
सदाशिव पाटील, निर्माता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे आरोप मान्य नाहीत सदाशिव पाटील यांनी केलेले हे आरोप मला अजिबात मान्य नाहीत. डबिंगबाबत त्यांनी अजिबातच विचारणा केली नव्हती. तसेच मला न विचारता माझ्या पात्रासाठी दुसऱ्याच्या आवाजात डबिंग करणे ही गोष्ट योग्य नाही. मला या वादात पडायचेच नव्हते. मात्र आपली चित्रपटसृष्टी विश्वासावर चालते. त्यात अशा व्यक्ती असतील, तर लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे.
– भरत जाधव, अभिनेता.