मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय आणि त्याची चाकोरी सोडून मांडणी करण्याचा प्रयत्न होताना दिसतात. अशा संपूर्णपणे वेगळा प्रयत्न म्हणून ‘भातुकली’ या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. अतिशय व्यस्त असलेल्या आजच्या शहरी जीवन जगणाऱ्या प्रत्येकाला कुटूंबासोबत काही आनंदाचे क्षण घालविण्यासाठी फुरसत नसते. अशाच एका व्यस्त उद्योगपतीच्या आयुष्यातील एक दिवस असा या चित्रपटाचा साधाच पण उत्कंठावर्धक पद्धतीने उलगडत जाणारा विषय दिग्दर्शकाने पडद्यावर दाखवला आहे.
श्रीकांत देशमुख या स्वत:च्या कष्टाने बडा उद्योगपती बनलेल्या मध्यमवयीन माणसाच्या वाढदिवसाच्या एका दिवसात घडणारी गोष्ट दिग्दर्शकाने सांगितली आहे. आजकाल कुटूंबासाठी वेळ देऊ न शकणाऱ्या अतिशय व्यग्र, व्यस्त जीवन जगणाऱ्या, कॉपरेरेट जगात उच्च स्थानी पोहेचलेल्या माणसाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
श्रीकांत देशमुखच्या वाढदिवसानिमित्त तो आपली मुलं, बायको, आई, भाऊ यांना एका फार्महाऊसवर भेटणार आहे. त्याची जय्यत तयारी त्याचे कुटूंबीय आणि त्याचा खासगी सचिव रमेश शिंदे असे सगळेजण करताहेत. प्रत्येकाला भेटण्याची वेळ श्रीकांत देशमुखने ठरवली आहे. भेटून आपले बाबा, आपला नवरा आणि आपला मुलगा काय सांगणार, त्याच्यासाठी कोणकोणत्या भेटवस्तू द्यायच्या याची चर्चा कुटूंबात रंगलीय. अचानक शंतनू अत्रे हा श्रीकांत देशमुखचा मित्र येतो. नंतर श्रीकांत देशमुख सर्वाशी बोलतो, भेटवस्तू देतो आणि काही साध्याच पण चमत्कारिक गोष्टी घडतात. सर्वजण सहलीला जातात. सहलीतील गोष्टी आणि तिथून परतल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी यात एक रहस्य दडले आहे. वरवर सरळसाध्या पण चमत्कारिक गोष्टीचे रहस्य चित्रपटात दिग्दर्शकाने अतिशय तरलपणे उलगडून दाखविले आहे.
‘भेजा फ्राय’फेम सागर बल्लारी या चित्रपटाचा निर्माता असून रोहित जोशी या लेखक-दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट आहे. अप्रतिम संगीत, पाश्र्वसंगीत, गाणी असलेल्या या चित्रपटाचे कथानक फक्त एका बंगल्यात आणि एका सहलीच्या ठिकाणी अशा दोनच लोकेशनवर घडताना दाखविण्यात आले आहे.
श्रीकांत देशमुख हा यशस्वी उद्योजक, स्वत:च्या भल्यामोठय़ा कंपनीचा मालक, श्रीमंत परिणामी अतिशय आत्मकेंद्री आहे. स्वत:च्या मनात पक्क्या झालेल्या संकल्पनांनुसार घरातील सर्वानी असले पाहिजे अशी त्याची आग्रही भूमिका आहे. त्यामुळे त्याने सांगितल्याप्रमाणे, त्याला आवडते अशाच रंगाची साडी नेसून त्याची बायको जानकी त्याच्या वाढदिवसाची तयारी करते. छोटा अन्वय, आदित्य, भार्गवी आणि श्रीकांत देशमुखची आईसुद्धा श्रीकांत देशमुखला आवडते अशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतात. परंतु, आत्मकेंद्री स्वभावामुळे हेकट बनलेला श्रीकांत देशमुखचे कुणाशीच पटत नाही. श्रीकांत देशमुख स्वत: आणि त्याच्या घरातील सर्व मंडळी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या घरात आपल्या माणसांशी कुणी असे वागते असा प्रश्न प्रेक्षकाला पडतो. आपले बाबा बऱ्याच दिवसांनी का वर्षांनी आपल्याला भेटणार आहेत म्हणून त्यांनी आपल्याला असे फार्महाऊसवर बोलावले असेल का असे प्रश्न श्रीकांत देशमुखच्या मुलांना पडतो परंतु, बाबांचे सचिव रमेश शिंदे काका यांनी सांगितले तसे वागायचे असे ठरवून सगळेजण वागत आहेत.
अजिंक्य देवच्या कारकिर्दीतील उत्तम भूमिका असलेला हा महत्त्वाचा चित्रपट ठरेल. अजिंक्य देवच्या आतापर्यंतच्या भूमिकांमधील सर्वाधिक परिपक्व भूमिका त्याने तितक्याच समरसून साकारली आहे. स्मिता तळवलकर यांनी साकारलेली आई, शिल्पा तुळसकरने साकारलेली जानकी ही श्रीकांत देशमुखच्या बायकोची व्यक्तिरेखा, सुनील बर्वेने साकारलेली रविकांत देशमुख ही श्रीकांत देशमुखच्या भावाची भूमिका आणि किरण करमरकरने साकारलेली शंतनू अत्रे ही व्यक्तिरेखा असो सगळ्या कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.
आतापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये कधीही न आलेला विषय या चित्रपटातून दिग्दर्शकाने अतिशय खुबीने मांडला आहे. मध्यांतरापूर्वीच्या कथानक वेगवान असते तर चित्रपट अधिक भिडला असता असे प्रेक्षकाला वाटते. परंतु, अनोख्या विषयावरचा चपखल पद्धतीच्या नेटक्या दिग्दर्शनामुळे चित्रपट रंजन नक्कीच करणारा आहे. सरधोपट विषयांच्या चौकटीबाहेरचा ‘चिवित्र’ पण गमतीदार मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2014 रोजी प्रकाशित
चौकटीबाहेरचा ‘चिवित्र’ मनोरंजक
मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय आणि त्याची चाकोरी सोडून मांडणी करण्याचा प्रयत्न होताना दिसतात. अशा संपूर्णपणे वेगळा प्रयत्न म्हणून ‘भातुकली’ या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.
First published on: 15-06-2014 at 12:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhatukli marathi movie review