भालचंद्र कदम, ऋषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव या विनोदी बादशहांना एकत्र आणत प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी ‘सायकल’ या चित्रपटाचा प्रवास केला. गेल्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सर्वत्र त्याचीच चर्चा पाहायला मिळाली. चित्रपटाव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीची चर्चा कलाविश्वात पाहायला मिळाली ती म्हणजे ‘सायकल’च्या प्रमोशनमध्ये भाऊ कदमची गैरहजेरी. प्रमोशनमध्ये प्रकाश कुंटे, ऋषिकेश जोशी आणि प्रियदर्शन यांना पाहिलं गेलं. पण भाऊ मात्र कुठेच नव्हता आणि यामागे काय कारण असावं याच तर्कवितर्कांना सध्या उधाण आलं आहे.
भाऊ आणि प्रियदर्शन या चित्रपटात चोरांची भूमिका साकारत आहेत. तसं पाहिलं तर या दोघांची भूमिका बरोबरीची आहे पण तरीही प्रमोशनच्या कार्यक्रमात प्रियदर्शनसोबत भाऊ दिसत नव्हता. पण त्याच वेळी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये भाऊ दिसला. मग भाऊ इथं हजर राहू शकतो तर ‘सायकल’च्या प्रमोशनमध्ये का नाही असा प्रश्न उपस्थित होतो.
‘चला हवा येऊ द्या’मध्ये भाऊची उपस्थिती आणि ‘सायकल’च्या प्रमोशनला अनुपस्थिती असण्यामागे ‘चॅनल वॉर’ तर कारणीभूत नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण ‘सायकल’चे सादरीकरण ‘वायकॉम१८ मोशन पिक्चर्स’ने केले आहे आणि ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचाही भाऊ कदम भाग आहे. त्यामुळे ‘वायकॉम १८’ आणि ‘झी’मधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. या वादामुळे भाऊ ‘सायकल’च्या प्रमोशनमध्ये जाण्यास टाळत असल्याचं म्हटलं जात आहे. यामागचं नेमकं कारण जाणून घेण्यास भाऊ कदमशी संपर्क साधला असता, काही कार्यक्रमांच्या तारखा आधीच ठरल्यामुळे मी ‘सायकल’च्या प्रमोशनला पुरेसा वेळ देऊ शकलो नाही अशी प्रतिक्रिया त्याने दिली. तर ‘वायकॉम १८’शी संपर्क साधला असता त्यांनी याबद्दल बोलणं टाळणं.