‘बबन’  चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर आता द फोक कोनफ्लुअन्स इंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मितीसंस्था पुन्हा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. काही दिवसापूर्वीच या नव्या चित्रपटाचं टीझर पोस्टरद्वारे प्रदर्शित करण्यात असून प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे.

ग्रामीण जीवनावर भाष्य करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करणारे भाऊराव कऱ्हाडे यांनी या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. या चित्रपटाचं नाव ‘हैद्राबाद कस्टडी’ असं आहे.

प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नावावरुन आणि टीझर पोस्टरवरुन हा चित्रपट पोलीस कोठडी आणि कैद्यांच्या जीवनावर आधारित असल्याचं दिसून येत आहे. शिवाय, या चित्रपटाच्या टीझर पोस्टरवर, थर्ड डिग्रीसाठी वापरण्यात येणारा पट्टादेखील पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. इतकेच नाही तर चित्रपटाच्या नावामुळे हा चित्रपट नक्की कशावर आधारित आहे याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाऊराव यांचे ‘ख्वाडा’, आणि ‘बबन’ हे दोन्ही चित्रपटही ग्रामीण जीवनावर भाष्य करणारे असल्यामुळे त्यांचा आगामी ‘हैद्राबाद कस्टडी’ हा चित्रपटही त्याच धरतीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धूरा विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड, भाऊसाहेब शिंदे, रजनीकांत सदाशिव निमसे आणि सुशीला कानडे यांनी सांभाळली आहे. तसंच लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.