बिग बॉसच्या १०व्या पर्वातील दुस-या आठवड्यात पुन्हा एकदा एलिमिनेशची वेळ आली आहे. या आठवड्यात इंडियावाले टीममधील आकांक्षा शर्मा बाहेर जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व सदस्यांकडून सारखे मत मिळाले आहे. याचा अर्थ प्रेक्षकांकडून तिला हिरवा कंदील मिळालेला नाही. आकांक्षा शर्माचे कनेक्शन भारताचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग याच्या परिवाराशी असल्याने तिला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. पण याचा तिला काही खास फायदा होऊ शकला नाही.
बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये आल्यानंतर तिने युवराजच्या भावाबद्दल ब-याच गोष्टी केल्या होत्या. त्याचसोबत युवराज आणि त्याच्या आईवरही तिने आरोप लावले होते. पण, इतके सर्व काही करुनही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवण्यास ती अयशस्वी ठरली. आकांक्षाच्या आधी शोमध्ये भांडणांमुळे चर्चेत आलेली प्रियांका जग्गा बाहेर पडली होती. मात्र, प्रियांकाच्या एलिमिनेशने अनेकांना धक्का बसला होता. प्रियांका ही सर्व सदस्यांमध्ये बरीच सक्रिय होती. सेलिब्रेटी सदस्यांना ती चांगल्या पद्धतीने टक्करही देत होती.
२०१४ मध्ये आकांक्षाचे युवीच्या भावासोबत लग्न झाले होते. एका प्रसिद्ध कुटुंबामध्ये विवाह झाल्यामुळे आकांक्षाच्या मित्रपरिवारामध्ये आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. पण, तिच्या बाबतीच मात्र याउलटच घडले. एका प्रतिष्ठित कुटुंबामध्ये विवाहबद्ध झालेल्या आकांक्षाला जोरावरमध्ये एक चांगला पतीही नाही गवसला आणि चांगला मित्रही. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांमध्येच तिला जगण्यापेक्षा मरण्याचा मार्ग जास्त सोपा वाटू लागला. आकांक्षावर एक वेळ तर अशीही आली होती, जेव्हा तिला घर सोडून पळून जावेसे वाटत होते. पण कोणताही चुकीचा निर्णय न घेता आकांक्षाने या नात्यातून स्वत:ला वेगळे करत एकटे जगण्याचा निर्णय घेतला. ‘मला माझ्या सासरच्यांकडून काहीही नको आहे. मला फक्त जोरावरपासून घटस्फोट हवा आहे’, असे आकांक्षा म्हणाली होती.