बिग बॉसच्या अंतिम सोहळ्यात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या आगामी पॅडमॅन सिनेमाचे प्रमोशन करण्यास आला होता. यावेळी अक्षयने सलमानसोबत खूप धमाल केली. या शोमध्ये अक्षयने सॅनिटरी नॅपकीन बनवायचे मशीनही आणले होते. या मशीनपासूनच फक्त २ रुपयांमध्ये अरुणाचलम नॅपकीन बनवायचे असे अक्षय म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षय पुढे म्हणाला की, ‘पॅड बनवायच्या मशीनची किंमत कोटी रुपयांच्या घरात असते. पण अरुणाचलम यांनी फक्त ६० हजार रुपयांमध्ये हे मशीन बनवल्याचे त्याने सांगितले.’ अरुणाचलम यांना हवे असते तर त्यांनी या मशीनचे हक्क विकत घेऊन कोट्याधीश झाले असते पण त्यांनी असे काही केले नाही. यावेळी अक्षयने सलमानसोबत त्या मशीनवर सॅनिटरी नॅपकीन तयार केले.

मशीनच्या आत सेल्यूलस फाइबर टाकून ते एका मिक्सर ग्राईंडरमध्ये एकसंध केले जाते. यानंतर दुसऱ्या मशीनमध्ये त्या मिश्रणाला सॅनिटरीचा आकार दिला जातो. सॅनिटरी नॅपकीनचे महत्त्व सांगताना अक्षय म्हणाला की, आजही देशातील ८० टक्के महिला या राख आणि वाळलेल्या पानांचा वापर करत आहे जे फार गंभीर आहे. यावर लक्ष देणं गरजेचं असल्याचं तो म्हणाला.

अरुणाचलम मुरुगनाथम यांनी ग्रामीण भागातील महिलांनी पाळीच्या दिवसांमध्ये वापरायचे सॅनिटरी पॅड वापरावेत, यासाठी चळवळ सुरू केली होती. सिनेमात अक्षय कुमार अरूणाचलम मरुगनाथम यांची भूमिका साकारत आहे. अक्षय गावातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन तयार करण्याचे यंत्र तयार करतो, असे दाखवण्यात आले आहे. या यंत्रामुळे गावातील स्त्रियांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याचा त्याचा हेतू असतो. मात्र, अक्षयच्या या कामाला त्याच्या पत्नीसकट सगळ्यांचाच विरोध असतो.

गावातील प्रत्येक व्यक्ती त्याची थट्टा करत असते. मासिक पाळीवेळी महिला कपड्याचा वापर करतात. कपड्याच्या वापरामुळे त्या आजारीही पडतात, त्यामुळे अक्षय त्यांच्यासाठी सॅनीटरी नॅपकिन बनवायला सुरूवात करतो. ट्रेलरमध्ये अक्षय सॅनिटरी नॅपकीन बनवून मुलींना वाटताना दिसतो. पण त्याच्या या कृतीमुळे मुली त्याच्यापासून दूर पळतात. स्वतः अक्षय सॅनिटरी नॅपकीन वापरुन पाहतो. आपला नवरा सॅनिटरी नॅपकीन बनवतो या गोष्टीची लाज वाटून अरुणाचलम यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. सिनेमात राधिका आपटेने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

एकीकडे पत्नी सोडून जाते तर दुसरीकडे कोणीही मदत करायला तयार नसते. पण याचवेळी त्याच्या मदतीला सोनम कपूर येते. तिच्या मदतीने अक्षय अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या कामाला लागतो. यादरम्यान संयुक्त राष्ट्राच्या एका कार्यक्रमात अक्षय प्रेरणादायी भाषण देताना दिसतो. संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयात चित्रीकरण झालेला हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी हाफ गर्लफेंडचे चित्रीकरण संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयात करण्यात आले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 11 akshay kumar padman promation on salman khan bb 11 show
First published on: 15-01-2018 at 17:49 IST