बिग बॉसच्या घरामध्ये आता प्रत्येक सदस्याला विशिष्ट नावाने ओळखलं जाऊ लागलं आहे. त्यांची टास्क खेळण्याची पद्धत, घरातील वागणं यावरुन त्यांना ही नावं मिळाली आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे माधव देवचके. माधवला ‘मोस्ट बॅलेन्स्ड बिग बॉस कंटेस्टंट’ अशी ओळख मिळाली आहे. सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय असलेल्या माधवने घरात प्रवेश करण्यापूर्वी विशेष तयार केली होती. याविषयी माधवच्या पत्नीने बागेश्रीने सांगितलं आहे.
बिग बॉसच्या घरात स्पर्धकांनी प्रवेश करुन आता एक महिना पूर्ण झाला आहे. या एक महिन्यामध्ये घरात प्रत्येक विकेंडला रंगणाऱ्या डावामध्ये माधव वेगवेगळ्या लूकमध्ये दिसून आला. त्यामुळे त्याच्या या ड्रेसिंग सेन्सची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे. मात्र नव्या नव्या अंदाजात दिसणाऱ्या माधवने घरात जाण्यापूर्वीच ही पूर्वतयारी केली होती, याविषयी बागेश्रीने सविस्तर माहिती दिली आहे.
“गेल्या एका महिन्यापासून मी निरिक्षण करतेय, घरातील पुरुष सदस्यांचे कपडे आणि माधवचे कपडे यांच्यामध्ये बरंचसं अंतर आहे. माधव त्याच्या कपड्यांच्या बाबतीत पर्टिक्युलर आणि खेळाच्या बाबतीत कॉन्फिडंट असल्याचं दिसून येतं. माधवला एखादी भूमिका रंगवताना, त्या व्यक्तिरेखेची बोलण्या-चालण्याची ढब, संवादफेक, कपडेपट यावर काम करून पूर्वतयारी करण्याची सवय आहे. जशी तो आपल्या एखाद्या मालिकेसाठी किंवा सिनेमातल्या भूमिकेसाठी तयारी करतो, तसाच बिग बॉसच्या घरात जातानाही तो पूर्वतयारीनिशी गेला होता,” असं बागेश्रीने सांगितलं.
पुढे ती म्हणते, “एक अभिनेता असल्याने माधवला स्क्रिनवर कसे कपडे घालावे, याची उत्तम जाण आहे. कलर कॉम्बिनेशन कसे असावे, आपल्याला कसे कपडे शोभून दिसतील हे त्याला चांगले माहित आहे. त्यामुळे त्याने स्वत:साठी कपड्यांची निवडही तशीच केली. विशेष म्हणजे त्याने उत्तम कपड्यांची निवड केली होती. त्यामुळे बिग बॉसच्या घरात एवढ्या पूर्वतयारीनिशी गेलेला तो एकमेव सदस्य असावा.”
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या २ पर्वाची सुरुवात होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. या एका महिन्यामध्ये घरात अनेक घडामोडी घडल्या. काही सदस्यांना घरातून बाहेर पडावं लागलं. तर काही नव्या सदस्यांनी घरात प्रवेश केला. त्यामुळे सध्या हा शो रोज नवनवीन वळणं घेताना दिसत आहे.