बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. या बहुचर्चित रिअॅलिटी शोचा पहिला विजेता कोण ठरणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. सहा स्पर्धक बिग बॉसच्या घरात अंतिम फेरीसाठी होते. त्यापैकी शर्मिष्ठा राऊत सर्वांत आधी बाद झाली आहे. त्यामुळे आता फक्त पाच स्पर्धक राहिले आहेत. मेघा धाडे, आस्ताद काळे, पुष्कर जोग, सई लोकूर आणि स्मिता गोंदकर यांच्यामध्ये ही अंतिम लढत आहे. त्यामुळे विजेता कोण ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाइल्ड कार्ड एण्ट्रीने शर्मिष्ठा बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झाली होती. मेघा आणि तिच्यातली मैत्री बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरला आणि मेघामुळे ती प्रभावित होत असल्याचा आरोपही बऱ्याचदा घरातील इतर स्पर्धकांकडून केला गेला.

१५ एप्रिल रोजी बिग बॉस मराठीचा खेळ सुरू झाला. ज्यामुळे जवळपास १२ सेलिब्रिटींनी सहभाग घेतला. दररोज नवीन वाद, नवीन टास्क, टास्कदरम्यान सेलिब्रिटींनी एकमेकांवर केलेली कुरघोडी यांसारख्या अनेक गोष्टींमुळे हा शो कायम चर्चेत राहिला. बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण ठरणार याविषयी सोशल मीडियावर जवळपास आठवड्याभरापासून जोरदार चर्चा रंगली.