हिंदी चित्रपटसृष्टीवर फक्त काही मोठ्या प्रस्थांचच वर्चस्व असतं असं नेहमीच म्हटलं जात. पण, याच समजुतीला शह देत आजवर बऱ्याच कलाकारांनी या कलाविश्वात आपलं वेगळेपण सिद्ध करत कायमचं स्थान मिळवलं आहे. अशा कलाकारांची यादी तशी मोठी असली तरीही सध्याच्या घडीला या यादीतील एकच नाव चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ते नाव म्हणजे अभिनेता विकी कौशल याचं. मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या चित्रपटातील भूमिकेमुळे विकीच्या चाहत्यांचा आकडा झपाट्याने वाढला. पण, मुळात त्याच्या चाहत्यांच्या आकड्यात दिवसागणिक फार आधीपासूनच वाढ होत होती, फक्त त्याच्याविषयी वाच्यता झाली नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका सर्वसामान्य होतकरु कलाकाराच्या रुपात आलेल्या विकीने आज त्याच्या कारकिर्दीत बरीच प्रगती केली आहे. मुळात प्रेक्षकांनी ज्या कलाकारांना मोठं होताना पाहिलं आहे त्यातीलच हे एक नाव. नीरज घैवानच्या ‘मसान’ या चित्रपटामध्ये त्याने साकारलेल्या भूमिकेमुळे तर अनेक तरुणींना निरागस विकी भावला. ‘चॉकलेट बॉय’, ‘हँडसम हंक’ अशा विशेषणांच्या मागे न धावता अतिशय संयमाने आपल्या क्षेत्रात काम करत आणि आपल्या अभिनय कौशल्याला खुलवत विकी आज या टप्प्यावर पोहोचला आहे. चौकटीबद्ध चित्रपटांची निवड न करता नेहमीच काही अफलातून भूमिकांची त्याने निवड केली. मग ती वेब सीरिज असो किंवा एखादी छोटेखानी भूमिका, प्रत्येक पात्र साकारताना त्याने ते मोठ्या ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. चला तर मग जाणून घेऊया या चौकटीबाहेरील अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी…

*टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर म्हणून विकीने एका कंपनीमध्ये मुलाखत दिली होती. ज्यात त्याची निवडही करण्यात आली. पण, अमुक तासांपुरता काम करणं आणि रटाळ आयुष्य जगणं या गोष्टींना बाजूला सारत त्याने अभिनय क्षेत्रात नाव कमवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

* २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मसान’ चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी त्याने ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं होतं.

*’टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार विकीसुद्धा मुंबईच्या चाळ संस्कृतीतच मोठा झाला आहे. ‘दहा बाय दहा’ची खोली ही संकल्पना त्यान अत्यंत जवळून पाहिली आहे. सुरुवातीचे काही दिवस त्याचे वडील चित्रपटांमध्ये स्टंटमॅनची भूमिका साकारायचे.

वाचा : ‘who added whom first?’- फेसबुकने जुळवलेल्या एका लग्नाची गोष्ट

*’रमन राघव २.०’ हा विकीचा आणखी एक गाजलेला चित्रपट. पण, या चित्रपटासाठी त्याची निवड केल्यानंतरही अनुराग कश्यप त्याच्याविषयी साशंक होता. विकी नकारात्मक भूमिका साकारण्यात अपयशी ठरु शकतो हीच भीती त्याच्या मनात होती. पण, खुद्द विकीनेच अनुरागची मनधरणी करुन या चित्रपटासाठी ऑडिशन्स दिल्या आणि मग साकारण्यात आला ‘रमन राघव २.०’. असा हा अभिनेता विकी कौशल येत्या काळात हिंदी चित्रपटसृष्टी खऱ्या अर्थाने गाजवणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birthday special raazi masaan fame bollywood actor vicky kaushal is the best find of bollywood in recent times some interesting facts about him
First published on: 16-05-2018 at 09:26 IST