कार्टून व्यक्तिरेखांना सिनेमाच्या माध्यमातून लोकप्रिय करण्याचा जोरदार प्रयत्न सध्या हॉलीवूड सिनेसृष्टीत सुरू आहे. आणि त्यातही माव्र्हल आणि डीसी या दोन सुपरहिरोपट कंपन्या अग्रेसर आहेत. परंतु या दोघांमध्ये गेली अनेक वर्षे सुरू असलेली स्पर्धा आता सिनेमाच्या माध्यमातून आणखीनच तीव्र होत चालली आहे. दोन्ही कंपन्या सातत्याने एकमेकांवर कुरघोडय़ा करत असतात. त्यात ‘माव्र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ सध्या काही अंशी पुढे आहे. त्याचे कारण त्यांच्याकडे असलेल्या स्पाइडरमॅन, आयर्नमॅन, कॅप्टन अमेरिका, थॉर, हल्क यांसारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय सुपरहिरो व्यक्तिरेखा होय. परंतु दिवसेंदिवस हे जुने सुपरहिरो आता कालबाह्य होऊ लागल्यामुळे प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी त्यांना नवीन ताज्या दमाच्या सुपरहिरोंची गरज भासू लागली आहे. त्यासाठी माव्र्हलने डेडपूल, व्हिजन, नोव्हा, स्पीड, लुना यांसारख्या दुसऱ्या फळीतील नवीन सुपरहिरोंवर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. आणि या सुपरहिरोंच्या फौजेत नवीनच भरती झालेल्या ‘ब्लॅक पँथर’ने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले. भारतात १६ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदर्शित झालेला ‘ब्लॅक पँथर’ हा आजवरचा सर्वात जास्त कमाई करणारा सुपरहिरोपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवडय़ात जगभरातून तब्बल १३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली तर भारतात ३० कोटींचा गल्ला जमवण्यात या चित्रपटाला यश आले. याआधी द अॅव्हेंजर्स, थॉर राग्नारोक, डेडपूल या सुपरहिरोपटांनी पहिल्या आठवडय़ात १००० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स कमाईचा विक्रम केला होता. परंतु रायन कोग्लर दिग्दर्शित ‘ब्लॅक पँथर’ने या सर्वाचा विक्रम मोडीत काढला आहे. रॉबर्ट डाऊ नी ज्युनिअर ऊर्फ आयर्नमॅन हा गेली अनेक वर्षे माव्र्हलसाठी गर्दी खेचणारा हुकमाचा एक्का म्हणून काम करत होता. परंतु त्याच्यानंतर कोण? हा प्रश्न कायम असतानाच त्यावर तोडगा म्हणून पुन्हा एकदा स्पायडरमॅनवर मोठी गुंतवणूक करण्यात आली. परंतु स्पायडरमॅनला आयर्नमॅनइतके मोठे यश मिळवता आले नाही. परिणामी पुढच्या सुपरस्टारचा शोध सुरू असतानाच ‘ब्लॅक पँथर’ने मिळवलेले यश नक्कीच उल्लेखनीय आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Mar 2018 रोजी प्रकाशित
‘ब्लॅक पँथर’ माव्र्हलचा नवीन एक्का
कार्टून व्यक्तिरेखांना सिनेमाच्या माध्यमातून लोकप्रिय करण्याचा जोरदार प्रयत्न सध्या हॉलीवूड सिनेसृष्टीत सुरू आहे.
Written by मंदार गुरव

First published on: 04-03-2018 at 03:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black panther box office collection break all record hollywood katta part