आपल्या आवडत्या कलाकाराच्या प्रत्यक्ष दर्शनाने प्रचंड सुखावून जाणे अशा आपल्याकडील चाहते संस्कृतीचा कधी कधी अतिरेक होतो नि केतकी माटेगावकरसारखे प्रकरण घडते. सुदैवाने ती गर्दीच्या अतिउत्साहाच्या रेट्यात बचावली. दुर्दैवाने अशा परिस्थितीत काही भलतंच घडले तर आयोजकांनी सुरक्षिततेची काळजीच न घेतल्याचा मुद्दा उपस्थित होईलच पण कलाकारांनी फक्त मानधनाचा आकडा पाहूनच होकार दिला का, असाही अवघड प्रश्न निर्माण होईल तो वेगळाच! केतकीप्रमाणेच इतरही काही मराठी हिंदीच तर झालेच पण जवळपास सर्वच भाषांतील चित्रपट कलाकारांच्या वाट्याला हे असे चाहत्यांचे उतू जाणारे प्रेम येते. श्रीदेवीदेखील अशा अनुभवातून गेलीये. आपल्या पित्याच्या निवडणूक प्रचारासाठी दक्षिणेकडील एका छोट्याशा गावात ती ट्रेनमधून उतरताच तिला गर्दीचा पडलेला विळखा चिंताजनक ठरला. हेमा मालिनीला एका प्रकरणात नागपूर न्यायालयात जाण्याची वेळ आली, तेव्हाही तिला अशाच गर्दीतून वाट काढावी लागल्याची बातमी गाजली. शाहरुख खान ‘रईस’च्या प्रसिद्धीचा भाग म्हणून राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला जाताना गर्दीच्या रेट्यात बडोद्यात एक बळी गेला तर कोटा स्टेशनवर प्रचंड गोंधळ उडाला… सगळ्यात एकच गोष्ट कॉमन; चाहत्यांना प्रत्यक्षात कलाकारांचे दर्शन घ्यायचेय आणि मग त्याच वेळेस गर्दीचा वाढणारा उत्साह आणि सुटणारा संयम या आक्रमणाला थोपवणे कठीण होते. एखाद्या लहान-मोठ्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय सोहळ्यास कलाकाराने उपस्थित राहण्याचा उद्योग फारच फोफावताना त्यात सुरक्षिततेबाबत खरंच तेवढीच काळजी घेणेही वाढलंय काय? हा या सर्व घडामोडीत महत्त्वाचा प्रश्न झालाय. अनेकदा तरी आयोजक अतिउत्साही असतात, गर्दीच्या मानसिकतेवर त्यांचे लक्ष नसते वा त्याचे भान नसते. आतापर्यंत काही गोंधळ झाला नाही अथवा दुसरीकडे कुठे गोंधळात कलाकार सापडल्याचे त्याना माहिती नसते अथवा माहिती असले तरी त्याचे गांभीर्य लक्षात आलेले नसते. दुसरीकडे पाहिले तर सेल्फी युगात कलाकारांसोबत आपलाही सेल्फी असावा, अशी वृत्ती प्रचंड विकसित झालीय. प्रत्यक्ष ‘स्पॉट’वर अशा घटनांना विलक्षण वेग येतो. कोणाला कलाकाराला खूपच जवळून पाह्यचं असते, एखाद्यास याही गर्दीत कलाकाराला जुनी ओळख सांगायची असते, कोणाला एखादे काम आवडल्याचे प्रमाणपत्र द्यायचेय, कोणाला हात मिळवायचाय तर कोणाला नटीच्या कपड्याला तर झालेच पण शक्य झालेच तर अंगाला हात लावायचाय. खरंतर हेच हेतू साध्य करण्यास अनेक जण इच्छुक असतात. या सार्यातून जमा होणारा महागोंधळ म्हणजे एक नवे सामाजिक संकट होय. ते येईलच असे नाही अथवा येणारच नाही असेही नाही. कोणतेच संकट सांगून येत नाही. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॉलेज अथवा मॉल येथे जाण्याचे प्रमाण वाढतेय त्यातही एखादा लहानसा असा अपघात घडू शकतोही. याचा अर्थ कलाकारांनी चाहत्यांसमोर जायचे कशाला? अधिक उत्पन्नाचा सहज व सोपा असलेला ‘सुपारी’चा हव्यास वाढवायचा कशाला? (उदघाटने इत्यादीसाठी कलाकार हजर राहतो त्याला सुपारी म्हणतात) स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेता येत नाही का? आयोजकांना तसे स्पष्ट सांगता येत नाही काय? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. पण कलाकाराने स्वतःचे संरक्षण सोबत घेऊन फिरावे तर त्याचा खर्च आला आणि आयोजकावर भार टाकावा तर ते कलाकाराच्या बॉडीगार्डसचाही खर्च पेलण्यास तयार असावेत.
माफी मागा!; ‘त्या’ प्रसंगामुळे केतकीचे वडील महोत्सव आयोजकांवर नाराज
‘आर्ची’च्या दर्शनासाठी सैराट चाहत्यांवर लाठीमार
मोठ्या स्टारना हे सगळेच शक्य होते. काहींचे स्वतःचे बाऊन्सर अर्थात बॉडीगार्ड आहेत. काहींनी बर्या-वाईट अनुभवातून ठेवलेत. आयोजकांना त्याचा खर्च पेलवतो. पण मध्यम व छोट्या कलाकारांचे काय? गर्दीची मानसिकताही अशी की आपण अशा मध्यम कलाकाराच्या खूप जवळ जाऊ शकतो, असा त्याना प्रचंड आत्मविश्वास असतोच. काही कलाकारानाही वाटत असते की गोकुळाष्टमीला नाचलो म्हणजे चाहत्यांसमोर प्रत्यक्ष आपली कला साकारण्याची संधी मिळते. तेव्हा शरीर सौंदर्यावर पडणाऱ्या बर्या वाईट नजरा पचवण्याची तयारी असते अथवा घसघशीत मानधनातून ती नक्कीच येते. अभिनयापलिकडे जात पैसे मिळविण्याच्या संधी शक्यतो गमावू नयेत, अशी खोलवर रुजलेली मानसिकता व दृष्टिकोन योग्य की अयोग्य हा भागच वेगळा. पण अशा सार्वजनिक प्रसंगात चाहत्यांचे भन्नाट प्रेम किती व कसे स्वीकारायचे अथवा तेथून वेळीच कसे निसटायचे याचे भान हवेच. मध्यंतरी सातारा जिल्ह्यात एका सणाला एका राजकीय पक्षाने एका अभिनेत्रीला आणले म्हणून लगोलग दुसर्या पक्षानेही असाच डाव साधत त्याची भरभरून हवा तयार केली. कलाकार तसा गर्दीचा भुकेला असला तरी यावेळेस प्रत्यक्ष गर्दी पाहून ती अभिनेत्री एकदम ‘सही’ दचकली. तिला प्रसंगाचे गांभीर्य वेळीच लक्षात आल्याने तिने स्टेजवर चढतानाच उतरण्याचा निर्णय घेऊन संभाव्य संकट टाळले. प्रत्येकालाच हे जमेल असे नाहीच. पण एकूणच या चाहते प्रेमावर नेमका उपाय काय? सुनील गावस्करचे एक उदाहरण देतो त्यापासून काही शिकता येईल. फार पूर्वी गिरगावात ब्राह्मण सभागृहात त्याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असता त्याने एक दोन दिवस अगोदर आपल्या मित्राला तेथे जाऊन सगळी व्यवस्था कशी असेल, स्टेजची उंची किती हे पाहून यायला सांगितले. कलाकार सगळ्याच बाबतीत असे करु शकत नाहीत. लोकल ट्रेनमधून चित्रपटाचे प्रमोशन करताना सहप्रवाशी कसे असतील हे सांगता येणार नाही. तेव्हा कलाकार तारतम्य बाळगतो पण छोट्या शहरात वा गावात एखादी सुपारी असताना तेथील व्यवस्थेची चित्रफित मागवू शकतो. काही गडबड झालीच तर त्या आधारे बचावही करता येईल. नवीन माध्यमाचा वापर करून सार्वजनिक स्थळावरील चाहत्यांच्या प्रेमाचा बचाव करण्याचा मार्ग सापडेलही. चाहत्यांचे प्रेम उत्कट आहे की अतिरेकी याचे काही काही प्रसंगात उत्तर सापडत नाही. हा खूपच गुंतागुंतीचा क्षण असतो. तो घडतो आणि मग असे प्रश्न निर्माण होतात. अशा परिस्थितीत एखादी भयानक अथवा चिंताजनक अप्रिय घटना घडण्याची वाट पाहण्यापूर्वीच सावध राहिलेले बरेच. विविध संदर्भात कलाकारांना सार्वजनिक स्थळी जायचा योग नेहमीच असतो. तेथे चाहते भेटतात, बोलतात, जमल्यास सेल्फी काढतात, त्या कलाकाराला त्याच्याबद्दलचीच माहिती प्रेमाने देतात. पण एकदा का गर्दीच्या मानसिकतेचा संयम सुटला तर आवरणे जिकरीचे असते. तर जेथे गर्दी हुकमीच आहे तेथे तर आयोजन वादात येऊ शकेल. जे ‘रईस’च्या वेळेस झाले… असो. चाहत्यांना दुखावता येत नाही पण चाहते कलाकाराला इजा पोहोचवू शकतात. ती इजा गंभीर असेल तर आयोजकही मलम लावू शकत नाहीत. कलाकारानी असा सर्वच बाजूने विचार केल्यास उत्तम!
– दिलीप ठाकूर