पाकिस्तानी कलाकारांनी अद्याप उरी हल्ल्याचा निषेध केलेला नाही. यात बॉलीवूड काय करणार? पण यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध बिघडले तर पाकिस्तानी चित्रपटसृष्टी पूर्णपणे उध्वस्त होईल. जर पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवर बंदी घातली तर त्याचा मोठा फटका पाक चित्रपटसृष्टीलाच होईल असे म्हटले जातेय. लाखो लोक बेरोजगार होतील. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक हिंदी चित्रपट पाहिले जातात. त्यामुळे, शेकडोच्या संख्येने चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्स बंद होतील. शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानच्या चित्रपटांना तेथे जास्त पसंती मिळते.
पाकिस्तानमधील प्रसिद्ध चित्रपट समीक्षक उमर अलवी म्हणाले की, स्क्रिन्स आणि टॅक्समध्ये वाढ केल्यामुळे पाकिस्तानी चित्रपट उद्योगाला पुनरुज्जीवन मिळाले आहे. काही पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित झाले असून ते चांगली कमाई करत आहेत. तर काही चित्रपट आता प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. पण कोणत्याही चित्रपटसृष्टीला टिकून राहण्यासाठी वर्षाला ५० ते ६० चित्रपट प्रदर्शित करणे गरजेचे असते.
प्रसिद्ध निर्माता, वितरक आणि एट्रियम सिनेप्लेक्स सिरीजचे मालक नदीम मंडविवल्ला म्हणाले की, बॉलीवूड आणि हॉलीवूड चित्रपटांमुळे ७० टक्के व्यवसाय होतो. पण यात हॉलीवूडचा टक्का कमी आहे. ते म्हणाले की, यास काहीच पर्याय नाही. जर देशांमधील संबंधांमध्ये कटुता आली तर त्याचा परिणाम सर्वांवरच होईल. जेव्हा  पूर्व पाकिस्तानमध्ये चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. तेव्हा पायरेटेड डीव्हीडी आणि अशा त-हेच्या अन्य काही प्रकारांनी चोरून व्यापारात नफा झाला होता. आता केबल ऑपरेटर आहेत. जर कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात आली तर त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्रमावरही होईल. गेल्या काही वर्षांपासून या व्यापाराशी जोडले गेलेले सलीम खान यांच्या मते पाकिस्तानमध्ये अशी बंदी घातली जाणार नाही. पण जर असे झालेच तर चित्रपटगृहाच्या मालकांना त्यांचा व्यापार बंद करावा लागेल किंवा तोटा टाळण्यासाठी स्क्रिन्स कमी कराव्या लागतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood a lifeline for pakistani film industry
First published on: 29-09-2016 at 15:36 IST