काही अभिनेते हे त्यांच्या चित्रपटांसोबतच अनोख्या आणि प्रभावी अशा व्यक्तीमत्वामुळेही ओळखले जातात. अशाच अभिनेत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे अजय देवगण. २ एप्रिल १९६९ मध्ये अजयचा एका पंजाबी कुटुंबात जन्म झाला. अजयचे वडील वीरु देवगण हे अॅक्शनपटांचे दिग्दर्शक आणि स्टंट कोरिओग्राफर होते.
१९९१ ला प्रदर्शित झालेल्या ‘फूल और काँटे’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तेव्हापासून सुरु झालेला त्याचा प्रवास हा आजतागायत सुरुच आहे. ‘टाईम्स नाऊ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अजय सध्याच्या घडीला जवळपास २०३ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यामागोमाग सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या नावांमध्ये त्याचा समावेश होतो. एका चित्रपटासाठी तो जवळपास २२ ते २५ कोटी रुपये इतकं मानधन आकारतो. चित्रपटांतून मिळणाऱ्या मानधनाव्यतिरिक्त चित्रपट निर्मितीमधून होणाऱ्या नफ्यातही त्याचा वाटा असतो. गेल्या पाच वर्षांमध्ये जवळपास ६० टक्के नफा अजयच्या वाट्याला आला आहे. मुंबईत अजयच्या नावे नऊ कोटी किंमतीचे दोन आलिशान फ्लॅट आहेत. त्याच्या राहणीमानाचा चाहत्यांना नेहमीच हेवा वाटतो. कार आणि बाईकचे स्टंट करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजयकडे काही महागड्या कारही आहेत. त्याच्याकडे जवळपास ९ लक्झरी कार आहेत. ज्यामध्ये मर्सिडीज, रेंज रोव्हर पासून बीएमडब्ल्यू आणि फरारीपर्यंतच्या कार्सचा समावेश आहे. त्याच्याकडे असणाऱ्या कार्सची किंमत जवळपास १० कोटींच्या घरात आहे.
त्याच्या या कलेक्शनमध्ये २.८ कोटींची maserati quattroporte या कारचाही समावेश आहे. मुख्य म्हणजे ही कार घेणारा अजय हा पहिला भारतीय व्यक्ती ठरला होता. २००६ मध्ये त्याने ही कार खरेदी केली होती. त्यामुळे त्याचा हा ‘कार’नामा नेहमी अनेकांच्या लक्षात राहिला. त्याशिवाय स्वत:चं प्रायव्हेट जेट असणारा पहिला सेलिब्रिटी म्हणूनही अजचच नाव घेतलं जातं.
खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात योग्य तो समतोल राखणाऱ्या अजयने २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये अभिनेत्री काजोलसोबत लग्न केलं. त्याने कामासोबत नेहमीच आपल्या कुटुंबालाही प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अजयला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं असून यामध्ये भारत सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या पद्मश्री पुरस्काराचाही समावेश आहे.