बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चड्ढा रिलेशनशिपमध्ये आहेत का, हा प्रश्न अजुनही तुमच्या मनात घर करतोय? आता हा प्रश्न यापुढे कोणालाही सतावणार नाही कारण, खुद्द अलीनेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक सेल्फी पोस्ट करत रिचासोबतचं नातं सर्वांसमोर उघड केल्याचं पाहायला मिळत आहे.
सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळतं. सेलिब्रिटींचे अफेअर्स, त्यांचे रिलेशनशिप्स याविषयी जाणून घेण्यासाठी बरेचजण एखाद्या हेराप्रमाणे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सचा आधार घेतात. त्यामुळेच की काय, अलीने त्याचं आणि रिचाचं नातं थेट सोशल मीडियावरुनच सर्वांसमोर उघड केलं आहे. त्याने रिचासोबतचा एक सेल्फी पोस्ट करत आपण रिलेशनशिपमध्ये आहोत याचा जाहीरपणे स्वीकार केलाय असंच म्हणावं लागेल. हा फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये अलीने लिहिलंय, ‘हा माझा आवडता फोटो…. आता आहे तर आहे…’
वाचा : रेखा आजही अमिताभ यांच्या ‘या’ दोन गुणांच्या प्रेमात
‘है तो है’ असं म्हणण्यामागे अलीचा नेमका काय उद्देश आहे याचा तर्क लावण्यासाठी फार काही शक्कल लढवण्याची गरज नाही. कारण त्या फोटोमध्ये अली आणि रिचाच्या चेहऱ्यावर असणारं स्मितहास्यं खूप काही सांगून जातंय. अली आणि रिचा गेल्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही रिचाने अलीसोबत हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमापासूनच माध्यमांमध्ये या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. किबंहुना त्यानंतर एका मुलाखतीदरम्यान अलीने रिचासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्यंही केलं होतं. रिचा आणि अलीच्या रिलेशनशिपच्या चर्चा पाहता आता ‘सेलिब्रिटी कपल्स’च्या यादीत आणखी एका जोडप्याचा समावेश झाला आहे असंच म्हणावं लागेल.