कोणत्याही क्षेत्रात नावारुपास आल्यावर त्या व्यक्तीभोवती अनेकांचीच गर्दी पाहायला मिळते. त्यातही बॉलिवूड सेलिब्रिटींभोवती चाहत्यांचा गराडा नेहमीच पाहायला मिळतो. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता अर्जुन रामपाल. काही दिवसांपूर्वीच अर्जुनला चाहत्यांचा सामना करावा लागला होता. सेल्फी काढू इच्छिणाऱ्या काही फॅन्सनी अर्जुनभोवती गर्दी केली तेव्हा त्याचं वेगळंच रुप पाहायला मिळालं.
त्यावेळी अर्जुन एका रेस्तराँमध्ये होता. मध्यरात्रीच तो त्या ठिकाणाहून निघाला. तेव्हा काही चाहत्यांनी अर्जुनच्या गाडीभोवती गर्दी करत त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. ‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटच्या वृत्तानुसार अर्जुनच्या वाहनचालकाला ज्यावेळी या सर्व प्रकारची कल्पना आली त्यावेळी त्याने चाहत्यांना तेथून जाण्याची विनंती केली. पण, चालकाची वर्तणूक काही चाहत्यांना पटली नाही.
या सर्व प्रकारानंतर त्यांनी अर्जुनच्या कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार कळताच अर्जुन कारच्या बाहेर आला. तेव्हा चाहत्यांनी चालकाच्या गैरव्यवहाराबद्दल अर्जुनकडे तक्रार केली. पण, अर्जुनही त्यावेळी बराच त्रस्त दिसत होता. चाहत्यांसोबत झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर या गर्दीतून वाट काढत तो थेट घरात निघून गेला.
वाचा : तैमुरला आशीर्वाद देणाऱ्या तृतीयपंथीयांवर पैशांचा पाऊस
चाहत्यांच्या या अशा वागण्यामुळे स्वत:वरील ताबा सुटण्याची अर्जुनची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी काही महिन्यांपूर्वी कनॉट प्लेस येथील एका नाइट क्लबमध्ये अर्जुनने चाहत्याला कॅमेरा फेकून मारला होता. हे सर्व प्रकरण बरंच चिघळलंही होतं. पण, त्यानंतर मात्र त्याविषयी कोणतीच वाच्यता झाली नाही. हे सर्व प्रकार पाहता चाहते आणि कलाकारही काही प्रसंगी मर्यादा ओलांडून वागतात हे लक्षात येत आहे. पण, या अशा वागण्यामुळे आता अर्जुनच्या स्टारडमवर आणि फॅन फॉलोइंगवर याचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.