आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता इरफान खान सध्या परदेशात असून, तो एका आजाराशी झुंज देत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हा आजार झाल्याचं त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं. इरफानच्या त्या एका ट्विटनंतर अनेकांनीच त्याच्याविषयी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यातच आता इरफानच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाल्याच्या चर्चांना उधाण आल्याचंही पाहायला मिळत आहे. पण, या सर्व अफवा असल्याचं खुद्द इरफानच्या प्रवक्त्यांनीच स्पष्ट केलं आहे.

‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सोशल मीडियावर इरफानविषयी सुरु असणाऱ्या सर्व चर्चा चुकीच्या आहेत. ‘सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून इरफानविषयी ज्या काही चर्चा पाहायला मिळत आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. ज्यामध्ये काहीच तथ्य नाही. मी त्यांच्या कुटुंबाच्या आणि मित्रपरिवाराच्या वतीने सर्वांना विनंती करतो इरफानला साथ देणं असंच सुरु ठेवा आणि त्याच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्याची प्रार्थना करा’, असं प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही गोष्टीची पडताळणी केल्याशिवाय त्याविषयी अफवा पसरवणं चुकीचं असून, इरफानच्या प्रकृतीविषयी कृपा करुन कोणत्याही अफवा पसरवू नका अशी विनंती त्यांनी सर्वांनाच केली.

वाचा : ‘या’ साऊथ सुपरस्टारच्या पुतणीसोबत प्रभासचे लग्न?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियाच्या माध्यामातून गेल्या काही दिवसांपासून इरफानच्या आजारपणाविषयी बऱ्याच गोष्टींच्या चर्चांना उधाण आलं होतं. ज्यामुळे चाहते आणि कलाविश्वातही संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. पण, आता त्याच्या प्रवक्त्यांकडूनच या सर्व अफवा असल्याचं कळल्यामुळे इरफानच्या प्रकृतीविषयीच्या या अफवा थांबतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, सध्या इरफान परदेशात उपचार घेत असून, येत्या काळात तो बरा होऊन लवकरच मायदेशी परतेल अशी चाहत्यांची इच्छा आहे.