संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाचा पोस्टर अभिनेत्री दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामागोमागच आता चित्रपटासंबंधीच्या आणखी काही चर्चाही रंगत आहेत. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत झळकणार आहे. तर दीपिका राणी पद्मिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार असून, शाहिद या चित्रपटामध्ये राजा रावल रतन सिंगची भूमिका रंगवणार आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं कथानक हाताळत भन्साळींनी हा चित्रपट साकारण्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली असून, ते रणवीरला या चित्रपटातून एका वेगळ्याच भूमिकेत सादर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटातून अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत असतानाच रणवीर त्याच्या भूमिकेची आणखी एक बाजू सादर करणार आहे. ज्यामधून खिल्जीचे मलिक कफूर या गुलामासोबत असलेले संबंधसुद्धा दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे रणवीर ‘पद्मावती’च्या निमित्ताने समलैंगिक भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

https://www.instagram.com/p/BZQd8Dbhxi6/

वाचा : उद्याच्या सूर्योदयासोबत राणी ‘पद्मावती’ येणार तुमच्या भेटीला

भन्साळींच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये अभिनेता जिम सार्भ मलिक कफूरची भूमिका साकारणार असल्याची माहितीसुद्धा सूत्रांनी दिली. त्याच्या भूमिकेबद्दल फार काही वाच्यता करण्यात आली नाहीये. पण, या चर्चा खऱ्या असतील तर रणवीरच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहता येईल हे नक्की. ‘पद्मावती’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातही भन्साळींचं संगीत आणि दिग्दर्शन असल्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांनाही बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षावर ‘पद्मावती’ कितपत उतरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.