‘गोलमाल ३’ या चित्रपटामध्ये अडखळणाऱ्या ‘लक्ष्मण’ची भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस तळपदे या चित्रपटाच्या पुढच्या भागात म्हणजेच ‘गोलमाल अगेन’मध्ये पुन्हा अडखळताना दिसणार नाहीये. पण, या चित्रपटात त्याच्या भूमिकेला एक वेगळाच ट्विस्ट असणार आहे हे नक्की. बोलताना अडखळणाऱ्या व्यक्तीची भूमिका श्रेयसने साकारल्यामुळे मागच्या वेळी काही अडचणी आल्या होत्या. त्यामुळे यावेळी त्या सर्व संवेदनशील गोष्टींबद्दल जास्तच काळजी घेण्यात येत आहे. ‘चित्रपटाच्या या भागात मी अडखळणार नसून, त्याऐवजी माझ्या भूमिकेत गमतीदार बदल करण्यात आला आहे’, असं श्रेयसने स्वत:च माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले.
२०१० मध्ये ‘इंडियन स्टॅमरिंग असोसिएशनतर्फे ‘गोलमाल ३’च्या निर्माता आणि दिग्दर्शकांविरोधात नाराजीचा सूर आळवण्यात आला होता. अडखळत बोलणाऱ्या व्यक्तींची खिल्ली उडवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. त्यामुळे ‘गोलमाल अगेन’मध्ये त्याच्या भूमिकेविषयी विशेष काळजी घेण्यात आली. याविषयीच सांगताना तो म्हणाला, ‘काही गोष्टींवर निर्बंध आहेत. त्या गोष्टीची आपल्याला जेव्हा आवश्यकता असते तेव्हा आपल्याला त्यासाठी लढण्याची गरज आहे.’




पाहा : सलमान, हृतिकला टक्कर देतोय हा आयपीएस अधिकारी
‘गोलमाल अगेन’ या चित्रपटात थरारक दृश्यांवर जास्त भर देण्यात आला आहे. याविषयी सांगताना श्रेयस म्हणाला, ‘आमच्यामध्ये अजय देवगण वगळता कोणीही फार काही स्टंट्स केले नाहीयेत. पण, रोहित शेट्टी म्हटलं की अॅक्शन आलीच पाहिजे. त्याच्या चित्रपटाचा विषय निघाल्यावर किती कार आदळल्या आणि किती स्टंट्स होते याचीच चर्चा होते. तसंच इथेही झालं. मी जेव्हा चित्रपटाच्या सेटवर गेलो तेव्हा आम्हाला वाटलं की आता कारमध्ये बसून दृश्य चित्रीत केलं जाणार आहे. पण, तसं काहीच झालं नाही. उलट, तुम्ही फक्त कारच्या बाहेर उड्या मारणार आहात असं रोहित शेट्टी हसून म्हणाला.’
रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ या चित्रपटाच्या चौथ्या भागाबद्दल सध्या प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. विनोद, अनोखा अंदाज आणि खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालेली कलाकारांची फौज पाहता ‘गोलमाल अगेन’ मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी असणार असं म्हणायला हरकत नाही.