करण जोहरचा लाडका ‘स्टुडंट’, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रीलंकन ब्युटी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ‘रिलोड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड वर्तुळात रंगत होत्या. किंबहुना या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. पण, ‘रिलोड’ नावाऐवजी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी एका वेगळ्याच म्हणजेच ‘अ जंटलमन’ या नावाने चित्रपटाचा पोस्टर आणि फर्स्ट लूक टिझर लाँच केला आहे.
‘फॉक्स स्टार स्टुडिओ’तर्फे या चित्रपटाचा फर्स्ट लूक टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. या टिझरमध्ये मोठ्या शिताफीने सिद्धार्थ आणि जॅकलिनचा चेहरा लपवण्यात आला होता. त्यामुळे हे दोन्ही कलाकार नेमके आहेत तरी कोण असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. या टिझरमागोमाग सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘अ जंटलमनचा’ आणखी एक पोस्टर लाँच केला आहे. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि जॅकलिन वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहेत.
वाचा: तिचं सोडाच पण तिच्या कुत्र्यालाही मी आवडत नाही- सलमान खान
‘अ जंटलमन’च्या पोस्टरवर ‘सुंदर, सुशील, रिस्की’ असंही लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे आता हा ‘जंटलमन’ नेमका असणार तरी कसा हाच प्रश्न उपस्थित केला जातोय. राज आणि डीके दिग्दर्शित हा चित्रपट एक अॅक्शन- कॉमेडी चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे. २५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने जॅकलिन आणि सिद्धार्थ पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळे बी- टाऊनमध्ये एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असंच म्हणावं लागेल.