सौंदर्य म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर एका शब्दात मागितलं तर अनेकजण दिवंगत अभिनेत्री मधुबाला यांचच नाव घेतात. असं नेमकं का होतं, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या आरस्पानी सौंदर्याने आणि घायाळ करणाऱ्या हास्याने अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या मधुबाला यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यांच्या बहिणीने म्हणजेच मधुर भूषण यांनी याविषयीची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वी केली.

मधुबाला यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटासाठीच्या तयारीला आता सुरुवात झाली असून, मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्रीची शोधाशोध सुरु असल्याचं कळत आहे. मुळात या चित्रपटाची घोषणा करण्यात आल्यानंतर लगेचच संपूर्ण चित्रपटसृष्टीसमवेत चाहत्यांच्या मनातही एकाच प्रश्नाने घर केलं होतं. तो प्रश्न म्हणजे मधुबाला यांची भूमिका नेमकी कोण साकारणार. त्यांचं स्मिहास्य, चेहऱ्यावर असणारे निरागस भाव आणि तितक्याच घायाळ करणाऱ्या अदा या सर्व गोष्टी म्हणजे मधुबाला यांच्या सौंदर्याची, व्यक्तीमत्वाची वैशिष्ट्य. तेव्हा आता या साऱ्याला साजेशी अभिनेत्री शोधणं हे निर्माते आणि दिग्दर्शकांपुढचं आव्हानच आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मधुबाला यांची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी अभिनेत्री करिना कपूरकडे विचारण्या करण्यात आली आहे. करिनाच या भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली निवड असल्याचं कळत आहे. करिनाच ही जबाबदारी पार पाडत तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला न्याय देऊ शकते, असं त्यांचं म्हणणं असल्याचं कळत आहे.

Get set post…- जगातलं सर्वाधिक उंचीवरील पोस्ट ऑफिस भारतात, तुम्ही पाहिलं का?

दरम्यान, याविषयीची कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता चित्रपटाशी संलग्न व्यक्ती कधी एकदा याविषयीची अधिकृत घोषणा करतात याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. करिनाशिवाय या भूमिकेसाठी प्रेक्षकांमधून इतरही काही अभिनेत्रींच्या नावांना पसंती दिली होती. ज्यामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित, दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्या नावांनाही पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत होतं.