संजय दत्तच्या जीवनावर चित्रपट साकारला जात असून अभिनेता रणबीर कपूर, संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. रणबीर या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेत असून या चित्रपटाच्या काही भागाचं चित्रीकरणही पूर्ण झालं आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटातून संजूबाबाच्या जीवनातील बरेच किस्से उलगडण्यात येणार आहेत. त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे माधुरी दीक्षितसोबतचं त्याचं अफेअर. पण, माधुरी-संजयचं नातं आणि त्याच्याशी निगडीत दृश्य या चित्रपटातून वगळण्यात आल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होत्या. माधुरीच्याच सांगण्यावरुन असं करण्यात आल्याचंही म्हटलं गेलं. याचविषयी एका मुलाखतीत विचारलं असता माधुरीने तिची बाजू मांडली आहे.

‘मी आज आयुष्याच्या ज्या वळणावर आहे त्या ठिकाणी मला या सर्व (संजय दत्तशी निगडीत चर्चा) गोष्टींबद्दल चर्चा करणं निरर्थक वाटतं. त्या गोष्टीला आज बरीच वर्ष उलटली आहेत. मला नाही माहित तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली पण, मला याचा काहीच फरक पडत नाही’, असं माधुरी म्हणाली. ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत ‘धकधक गर्ल’ने याप्रकरणी स्पष्टपणे तिचं मत मांडलं.

संजयच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये त्याच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. संजूबाबाच्या जीवनातील अशाच महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक म्हणजे त्याचं आणि माधुरीचं बहुचर्चित प्रेमप्रकरण. असंही म्हटलं जात होतं की या सेलिब्रिटी अफेअरची झलक या जीवनपटामध्ये पाहायला मिळणार आहे. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माधुरीच्याच सांगण्यावरुन हिरानी यांनी चित्रपटातील तिचा उल्लेख असणारी दृश्य वगळण्याचा निर्णय घेतला आहे. माधुरीची भूमिका साकारण्यासाठी या चित्रपटात अभिनेत्री करिश्मा तन्नाची निवड करण्यात आली होती. पण, तसं कोणतंही दृश्य दिसणार नाही हे जवळपास निश्चितच झालं आहे.