फॅशन इंडस्ट्रीतलं मोठं नाव असलेल्या बंटी प्रशांत यांच्या ‘पिंडदान’ या चित्रपटाविषयी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मॉडेल-अभिनेत्री मुग्धा गोडसेपासून ते अभिनेता भूषण प्रधानपर्यंत अनेक सेलिब्रेटींनी बंटी प्रशांत यांना या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या असून, चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
सारथी एंटरटेन्मेंटच्या पूनम शेंडे यांनी प्रस्तुत केलेल्या पिंडदान या चित्रपटाची निर्मिती उदय पिक्चर्स, अश्तिका इरा एलएलपी यांनी केली आहे. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ बंटी प्रशांत फॅशन इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनासाठी मिस इंडिया पूजा बत्रा, मुग्धा गोडसे, प्राची देसाई, तेजस्विनी पंडित, भूषण प्रधान असे आताचे आघाडीचे कलाकार फॅशनच्या रॅम्पवरून चित्रपटसृष्टीत आले. अनेक वर्षं फॅशन इंडस्ट्रीत वावरल्यानंतर या दोघांनी ‘पिंडदान’ हा चित्रपट केला आहे. त्यांच्या जाहिरात आणि फॅशन क्षेत्रातील अनुभवातून साकारलेल्या ‘पिंडदान’मध्ये उत्तम कथानक आणि उत्तम कलाकार दिसणार आहेत. अनेक वर्षांपासून फॅशन आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्यानं बंटी प्रशांत यांच्या चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता आहे.
‘बंटी प्रशांत यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाला अभिनेत्री मुग्धा गोडसेनं शुभेच्छा दिल्या. ‘आतापर्यंत प्रत्येक ठिकामी बंटी प्रशांत यांनी यश मिळवलं आहे. अत्यंत उत्साही असे हे कलाकार आहेत. त्यांच्यासह काम करण्याच्या अनेक छान आठवणी आहेत,’ असं मुग्धा म्हणाली.
‘फॅशन इंडस्ट्रीत मला उभं करण्यात बंटी प्रशांत यांची खूप मदत केली. अनुभवी आणि अभ्यासू असे हे कलाकार आहेत. त्यांचा पहिला चित्रपट पाहताना मला खूप अभिमान वाटला. हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल याची मला खात्री आहे,’ अशा शब्दांत अभिनेत्री प्राची देसाईनं बंटी प्रशांत यांना शुभेच्छा दिल्या.
‘मला घडवण्यात बंटी प्रशांत यांचा मोलाचा वाटा आहे. दहा वर्षांपासूनची आमची मैत्री आहे. त्यांच्या ग्रुमिंग सेशनमध्ये मी सहभागी झाले होते. फॅशन इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केल्यानंतर ते आता स्वतःचा चित्रपट घेऊन येत आहेत ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पहिल्याच चित्रपटाचा विषय वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा त्यांचा प्रयत्न खूप महत्त्वाचा आहे,’ असं अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं सांगितलं.
‘पुण्यातल्या एका मॅगझिनसाठी माझं आयुष्यातलं पहिलं फोटोशूट बंटी प्रशांत यांनी केलं होतं. त्यानंतर आम्ही नेहमीच एकत्र राहिलो. माझ्या सगळ्या फोटोशूटमध्ये त्यांनी केलेले फोटोशूट कायमच सर्वोत्तम राहिलं. त्यांचा चित्रपट त्यांच्यासारखीच एक वेगळी उंची गाठेल,’ अशी भावना अभिनेत्री आणि मिस इंडिया पूजा बत्रानं व्यक्त केली.
फॅशन इंडस्ट्रीत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुण-तरुणीसाठी बंटी प्रशांत हे पहिले गुरू आहेत. माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी केलेल्या फोटोशुटनंतर माझी अभिनयाची कारकिर्द सुरू झाली. त्त्यांनी केलेल्या शॉर्टफिल्म्सही खूप वेगळ्या होत्या. संवेदनशील विषय, त्याची तितक्याच वेगळ्या पद्धतीनं केलेली हाताळणी, चित्रभाषेचा सखोल विचार त्यातून दिसला होता. त्यामुळे आता त्यांच्या ‘पिंडदान’ या पहिल्या चित्रपटाबाबत मी खूप उत्सुक आहे. आतापर्यंत त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्ट इतकाच हा चित्रपट वेगळा असेल,’ असं भूषण प्रधाननं सांगितलं.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2016 रोजी प्रकाशित
‘पिंडदान’ विषयी बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रेटींमध्ये उत्सुकता!
मुग्धा गोडसेपासून ते भूषण प्रधानपर्यंत अनेक सेलिब्रेटींच्या चित्रपटासाठी शुभेच्छा
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 26-04-2016 at 16:56 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood and marathi celebrities curious about pindadaan