बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ही एक अशी अभिनेत्री आहे जिने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिकांद्वारे आणि तिच्या अदांच्या मदतीने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. तिची एक झलक पाहण्यासाठीसुद्धा चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. आपल्या सौंदर्याने आणि नुसत्या हसण्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही मराठमोळी अभिनेत्री एक चांगली नृत्यांगनाही आहे. पण, तुम्हाला माहितीये का? अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी माधुरी दुसरचं काम करत होती. आता ते नेमकं कोणतं काम, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?

अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्याआधी माधुरी तिच्या बहिणींसोबत नृत्याचं प्रशिक्षण देत होती. या कलेची आवड असणाऱ्या लहान मुलांना ही धकधक गर्ल नृच्याचं प्रशिक्षण देत होती. पण, त्याकरता ती किती शुल्क आकारायची हे काही तिच्या लक्षात नाही. माधुरी दीक्षित सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरीही सध्या ती एक नवी भूमिका पार पाडत आहे. नृत्यकलेचा पाया असणाऱ्या या अभिनेत्रीने ई- लर्निंग डान्स क्लासची सुरुवात केली आहे.

लहानपणापासूनच माधुरीला नृत्याची आवड होती. त्यानंतर ही आवड जोपासत तिने नृत्यकलेचं रितसर प्रशिक्षण घेत विविध स्पर्धांमध्येही सहभाग घेतला. नृत्याचा हाच वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी माधुरीने ई- लर्निंग डान्स क्लासची सुरुवात केलीये. तंत्रज्ञानाची जोड देत माधुरी या नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मुख्य म्हणजे यामध्ये तिच्या पतीची म्हणजेच डॉ. नेने यांचीही साथ लाभली आहे. तिच्या या डान्स क्लासशी निगडीत सर्व तांत्रिक गोष्टींची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. नव्या तंत्रज्ञानाला हाताळण्यात आपल्याला काही अडचणी येतात त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला यात पतीची फार मदत होत आहे असं माधुरीने स्पष्ट केलंय. तिच्या ई- डान्स क्लासमध्ये ३५ विविध नृत्यप्रकार शिकण्याची संधी मिळणार आहे. तेव्हा आता माधुरीच्या या नव्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.