स्वच्छता आणि शौचालय हे विषय हाताळत आता चित्रपटसृष्टीतही बऱ्याच चित्रपटांची निर्मिती करण्यात येत आहे. अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटानंतर आता राकेश ओमप्रकाश मेहरा अशाच धर्तीवर आधारित एका चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. घाटकोपरच्या झोपडपट्टीमध्ये सध्या मेहरा त्यांच्या आगामी ‘मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी एका महत्त्वाच्या अशा समाजोपयोगी कामातही योगदान दिलं आहे. ज्या ठिकाणी मेहरांच्या आगामी चित्रपटांचं चित्रीकरण सुरु आहे तेथे त्यांनी शौचालय बांधून घेण्याकडेही लक्ष दिले.
संबंधित परिसरामध्ये २० शौचालये बांधण्यासाठी मेहरांनी पालिकेकडून रितसर परवानगीसुद्धा घेतली आहे. यामध्ये ५ शौचालये महिलांसाठी आणि ५ शौचालये पुरुषांसाठी बनवण्यात येणार आहेत. त्यासोबतच एका सार्वजनिक शौचालयाच्या पुनर्बांधणीसाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. मेहरा यांच्या या अनोख्या योगदानाचा फायदा जवळपास १००० कुटुंबांना होणार आहे.
विविध विषयांवर भाष्य करणारे चित्रपट सादर करणाऱ्या राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सुवा अनस्टॉपेबल या एनजीओसोबत एकत्र येत हे काम हाती घेतले आहे. मुख्य म्हणजे गेल्या चार वर्षांपासून त्याचे हे काम सुरु असून आतापर्यंत त्यांनी बऱ्याच झोप़पट्टीवासियांची मदत केली आहे. याविषयीच सांगताना मेहरा म्हणाले, ‘माझे योगदान म्हणजे मोठ्या समुद्रातील एक पाण्याचा थेंब आहे. किंबहुना माझे योगदान त्याहीपेक्षा लहान आहे. या मोहिमेत आम्ही फक्त शौचालये बांधून तो विषय तेवढ्यावरच सोडत नाही. तर, त्यांची देखभाल, स्वच्छता याकडेही लक्ष दिले जाते.’
Fathers Day 2017: …‘हे’ सेलिब्रिटी साजरा करणार त्यांचा पहिला ‘फादर्स डे’
चित्रपट विश्वातील कलाकारांना बऱ्याच गोष्टी प्रेरित करतात. मेहरासुद्धा या कामासाठी अशाच एका गोष्टीपासून प्रेरित झाले. ‘साबरमती’ आश्रमातील शौचालयांची संकल्पना पाहून त्यांनी ही मोहिम राबवली आणि आज त्याअंतर्गत जवळपास ८०० हून जास्त शौचालये बांधण्यात आली आहेत. मेहरांच्या या कामासाठी सध्या त्यांची बरीच प्रशंसाही केली जात आहे. दरम्यान, सध्या ते मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या ४ मुलांच्या जीवनावर आधारित कथानकावर काम करत आहेत. त्यामुळे येत्या काळात या कथानकातून कोणता नवा संदेश राकेश ओमप्रकाश मेहरा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.
