दिग्दर्शक आणि अभिनेता कमाल आर खान नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर सक्रीय असणारा कमाल आर खान बॉलिवूड चित्रपटांपासून ते राजकीय मुद्द्यांवर आपलं मत मांडत असतो. यामुळे अनेकदा तो वादातही अडकला आहे. यावेळी त्याने श्रीलंकेतील आर्थिक संकटावर भाष्य केलं असून यानिमित्ताने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

श्रीलंकेत आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटामुळे सत्ताधारी राजवटीविरुद्धचा हिंसाचार आणि निदर्शने अद्याप सुरूच आहेत. महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर काही तासांतच ७६ वर्षांचे राजपक्षे यांनी सोमवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. यामुळे अधिकाऱ्यांना देशव्यापी संचारबंदी लागू करणं आणि राजधानी कोलंबोत लष्करी तुकडय़ा तैनात करणं भाग पडलं. या हल्ल्यानंतर राजपक्षे समर्थक राजकीय नेत्यांविरुद्ध व्यापक हिंसाचाराला तोंड फुटलं आहे. कमाल खानने मंगळवारी रात्री ट्वीट करत श्रीलंका आणि भारताची तुलना केली आहे.

पुढे जाऊन हे सर्व भारतातही होणार आहे असं कमाल खानन त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यावेळी कमाल खानने आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये वृत्तपत्रातील बातम्यांची कात्रणं शेअर केली आहेत. “इथं पहा भारत आणि श्रीलंकेत काय समान गोष्टी आहेत. हेच सर्व काही महिने आधी श्रीलंकेत सुरु होतं”.

तसंच कमाल खानने म्हटलं आहे की, “श्रीलंकेत लष्कराला शूट ऑन साईटचा आदेश देण्यात आला आहे. याचा अर्थ श्रीलंका आपल्या लोकांना मारत आहे. हा श्रीलंकेतील हिंदू-मुस्लीम राजकारणाचा परिणाम आहे. आता हिंदू, मुस्लीम कोणीही सरकारसाठी मौल्यवान नाही. भारतीयांकडे अद्यापही श्रीलंकेकडून शिकण्यासाठी वेळ आहे. हे राजकीय नेते कोणाचेच नाहीत”.

कमाल खानच्या या ट्वीट्सवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, “आपल्याला फक्त श्रीलंकेकडूनच शिकायचं आहे का? बांगलादेश, पाकिस्तानकडून आपण शिकत नाही का जिथे अल्पसंख्याकांना संपवण्यात आलं आहे. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा ते २५ टक्के होते आणि आता ०.१ टक्के आहेत”.

तर एका युजरने इतर ५५ इस्लामिक देशांमधील स्थितीबाबतही विस्तृतपणे सांगावं असं म्हटलं आहे. तेथील लोक शांततेत आणि बंधूभावाने जगत आहेत अशी मला आशा असल्याचं युजरने म्हटलं आहे. एका युजरने असं काहीही होणार नाही असं म्हणत कमाल खानला सुनावलं आहे.