अक्षय कुमार त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरंच काही पोस्ट करत असतो. त्याच्या आगामी चित्रपटाच्या बाबतीतील प्रत्येक माहिती तो पोस्ट करत त्यासंबंधीची माहिती देत असतो. या खिलाडी कुमारने नुकतंच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे.

‘हस मत पगली प्यार हो जायेगा’, असे बोल असणाऱ्या या गाण्यातून अक्षय कुमार (केशव) आणि भूमी पेडणेकर (जया) यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ‘जब से मिला हुं तुझसे मुस्कुराता रहता हूं…’ असं म्हणत पाहताक्षणी होणाऱ्या प्रेमाची अनुभूती या गाण्यातून होत आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सतत पाठलाग करणं, लपून त्याची किंवा तिची एक झलक पाहणं या सर्व गोष्टींवर हे गाणं उजेड टाकत आहे. उत्तर भारतीय तरुणाच्या भूमिकेत असणारा अक्षय अनेकांचीच मनं जिंकत आहे. मुख्य म्हणजे या गाण्यात भूमीची म्हणजेच जयाची एक झलक टिपण्यासाठी तो चक्क झाडावरही चढताना दाखवण्यात आला आहे. त्यामुळे अॅक्शन सीन्स करण्याचा त्याचा मोह इथेही आवरला नाही असं म्हणायला हरकत नाहीये.

या गाण्याच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा गायक सोनू निगमच्या आवाजातील गाणं ऐकण्याची संधी मिळाली आहे. सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेल्या या सुरेख प्रेमगीताला विकी प्रसादने संगीत दिलं असून, गरिमाने हे गीत लिहिलं आहे. श्री नारायण सिंग दिग्दर्शित ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट ११ ऑगस्टाला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय पहिल्यांदाच भूमी पेडणेकरसोबत स्क्रीन शेअर करत असल्यामुळे त्यांची ही प्रेमकथा पाहण्यासाठी प्रेक्षकांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. स्वच्छतेच्या मुद्याचा आधार घेत एका वेगळ्या क्रांतीच्या मार्गाने ‘केशव-जया’ची ही प्रेमकथा प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. मुख्य म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं कळत आहे.