दिलीप ठाकूर
हिंदी चित्रपटातील काही गाणी पाहण्यापेक्षा ऐकण्यात जास्त आनंद देतात ही वर्षानुवर्ष चालत आलेली जणू प्रथाच आहे. पण त्यातही काही गाण्यांमध्ये अगदी पडद्यावरीलही व्यक्तिरेखाही ऐकण्यात दंग राहतात अथवा तेही खूपच आनंदाने श्रोत्याची भूमिका पार पाडतात. असेच हे एक उत्कट गाणे म्हणजे,

गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैं
मैने हँसने का वादा किया था कभी
इसलिए अब सदा मुस्कुराता हूँ मैं

ईगल फिल्मच्या ‘लाल पत्थर’चे (१९७१) हे गाणे अगदी असेच आहे हे आठवलं? एका प्रशस्त महालात मोठ्या पियानोवर विनोद मेहरा हे गीत गातोय आणि अगदी समोरच आपल्या विशिष्ट ढंगात राजकुमार अतिशय शांतपणे चिरुट ओढत हे गाणे तल्लीनतेने ऐकतोय. पाठीच दूरवर हेमा मालिनी उभी राहून या गाण्याला दाद देतेय. तर एका खोलीत असणारी राखी हा आवाज ऐकून सुखावते. कशी सिच्युएशन आहे ना? आपणही या तिघांबरोबरच या गाण्यात एकरुप होतो.

ये मोहब्बत के पल कितने अनमोल हैं
कितने फूलों से नाज़ूक मेरे बोल हैं
सबको फूलों की माला पहनाता हूँ मैं
मुस्कुराता हूँ मैं…

संपूर्ण गाणे असे ऐकाच जागी असूनही ते पहावेसे वाटते याचे कारण पडद्यावर ते ज्या पध्दतीने ऐकले जातेय त्यात खरा रंग भरलाय. एफ. सी. मेहरा निर्मित व सुशील मुजुमदार दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा भावला नव्हता. पण हे गाणे मात्र त्या काळात बिनाका गीतमालामध्येही बरेच दिवस स्थान टिकवून होते.

रोशनी होगी इतनी किसे थी खबर
मेरे मनका ये दर्पण गया है निखर
साफ़ है अब ये दर्पण दिखाता हूँ मैं
मुस्कुराता हूँ मैं…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाणे ऐकताना राजकुमार विशिष्ट ढंगात पायही हलवतो. यावर त्याचे चाहते फिदा असत. हे गाणे त्याच्या अशाच स्टाईलसाठी पहावेसे वाटते, लक्षात राहिले. तसं पाहिलं तर संगीतकार शंकर-जयकिशन यांजकडे किशोरकुमार खूप कमीच गायलाय. त्यातील हे एक लोकप्रिय ठरलयं. देव कोहलीच्या या गीताला किशोरकुमारने बराच वरचा सूर लावलाय पण विनोद मेहरा ती उंची सादरीकरणात गाठू मात्र शकला नाही. त्याची ती कमतरता राजकुमार, हेमा मालिनी व राखी (त्या दोघी तर उंची दागिन्यांनी सजल्यात) यानी भरुन काढलीय.