आजच्या व्हॉट्सअॅप, स्काईपच्या जमान्यात पोस्टकार्ड अथवा एखाद्या कागदावर पत्र लिहिणे हे फारसे होत नसावे. पण फार पूर्वी चित्रपटात असे पत्र लिहिण्याच्या प्रसंगानुरूप गाणे असे, ते देखील प्रेमगीत तर असेच. पण त्यात एक हुकमी गंमत असे. आपला नायक गावावरून मुंबईत आलेला असे व तो अशिक्षित असल्याने नायिका त्याचे पत्र लिही…

गुम है किसी के प्यार में दिल सुबह शाम
पर तुम्हे लिख नहीं पाऊं, मैं उसका नाम, हाय राम

एका अतिशय शानदार बगिच्यातील हिरवळीवर धोतर-कुर्ता, मफलर अशा गावरान वेषात रणधीर कपूर तर तेथीलच झोपाळ्यावर नारंगी साडीत छान सजून रेखा बसलीय आणि तो तिला आपल्या पत्राचा मायना सांगतोय. मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘रामपुर का लक्ष्मण’ (१९७२) मधील हा प्रसंग. त्या काळातील मनोरंजन चित्रपटात साजेसाच.

सोचा है एक दिन मैं उससे मिल के
कह डालूँ अपने सब हाल दिल के
और कर दूँ जीवन उसके हवाले

एकमेकांशी छान संवाद-सुसंवाद साधत हे गाणे पुढे सरकते. त्या बागेत ते दोघेच कसे असा प्रश्न अशा वेळेस करायचा नसतो. त्यामुळेच तर त्या बागेत त्याना एकांत मिळालाय. ते तेथे थोडेसे इकडे तिकडे फिरताहेत. पण हे पत्र नुसतेच ख्याली खुशालीचे नाही. तर त्यातूनच ते एकमेकांवरील प्रेमाची कबूली देताहेत. तिने झाडावर ‘लक्ष्मण ‘ असे रेखाटलयं. तोही मग छान खुलतो.

चाहा है तुमने जिस बावरी को
वो भी सजनवा, चाहे तुम ही को
नैना उठाए, तो प्यार समझो

गाता गाता रेखा छान लाजते आणि डोक्यावर पदर घेते. तिचे रुपडं पाहताना तिच्या कारकिर्दीचा हा साधारण सुरुवातीच्या काळातील चित्रपट आहे हे आजच्या पिढीतील रसिकांना पटकन लक्षात येईल. मजरुह सुल्तानपुरीचे गीत व राहुल देव बर्मनचे संगीत या जोडगोळीच्या अनेक लोकप्रिय गाण्यातील हे एक. रणधीर कपूरही गावरान वेषात खुललाय.

अपने होठों में पिया तेरा नाम
गुम है किसी के प्यार में दिल सुबह शाम
पर तुम्हे लिख नहीं पाऊं, मैं उसका नाम, हाय राम

पत्र लिहिण्याच्या अगदीच साध्या वाटणार्‍या प्रसंगातूनही प्रेम गीत-संगीताची मस्त गुंफण करता यायची हेच तर पूर्वीच्या काळातील चित्रपटाचे व त्यातील गीत-संगीत-नृत्याचे विशेष.
दिलीप ठाकूर