हिंदी चित्रपटाच्या वैविध्यपूर्ण व अफाट गीत संग्रहात प्रेम गीताचा सोनेरी साठा इतका व असा आहे की त्याला कधीच ओहोटी लागणार नाही. काही प्रेम गीते तर कायमच अजरामर असतात. जसे हे,
चुरा लिया है तुमने जो दिल को
नजर नही चुराना सनम
बदलके मेरी तुम जिंदगानी
नही बदलना जाना सनम …
एव्हाना विजय अरोरा व झीनत अमान तुमच्या डोळ्यांसमोर आले असणारच. अतिशयोक्ती होत नसेल तर गिटार धरलेली झीनत अगोदर आठवली असेल आणि प्रेम व संगीत यांची एकत्र मस्त झिंग आणणारे गाणे तब्बल ४४ वर्षांनंतरही आपला तजेलदारपणा कायम ठेवून आहे याचे विशेष कौतुकदेखील वाटत असेल. १९७३ च्या ‘यादों की बारात’च्या या गाण्याचे विशेष म्हणजे नुसते आपण ते गुणगुणले तरी पडद्यावरचे त्याचे सादरीकरण देखील डोळ्यासमोर येते. याचे श्रेय निर्माता- दिग्दर्शक नासिर हुसैन आणि गीतकार मजरूह सुल्तानपुरी, पार्श्वगायक आशा भोसले- मोहम्मद रफी व संगीतकार राहुल देव बर्मन अशा सगळ्यांनाच जाते.

बहार बनके आऊ कभी तुम्हारी दुनिया में
गुजर न जाए कही यह दिल कही इसी तमन्ना में…
एका छोटेखानी पण छान पार्टीत विजय अरोरा व झीनत अमान हे शेरो- शायरीने एकमेकांवर इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न करताहेत व पार्टीतील इतर जण व्वाह व्वाह करीत त्यांना प्रोत्साहन देताहेत. त्यातही विजय अरोरा जास्तच खुलल्याचे पाहून झीनत त्याला जरा थांब म्हणते. काही क्षणातच रुप पालटून ती अधिकच मादक रुपात अवतरते. ग्लासावर ग्लास आपटून आपला आव्हानात्मक हेतूच जणू स्पष्ट करते. लगेचच गिटार हाती घेऊन अधिकच मोकळेपणाने ती गाता गाता केवळ कटाक्षानेच विजय अरोरावर मात करते. अगदीच छोटीशी जागा व छोटीशी पार्टी, पण कमालीच्या मोहक मादक वातावरणाने गाणे जास्तच खुलते. या जाण्यामुळेच असे मधाळ वातावरण तयार झाले म्हणू या हवं तर…. येथेही दिग्दर्शक दिसतोय. नासिर हुसेन गाण्याच्या चित्रीकरणात मास्टर माइंड हे त्यांच्या जब प्यार किसीसे होता है, प्यार का मौसम, कारवा अशा अनेक चित्रपटातून केव्हाच सिद्ध झालयं.
सजाऊंगा लूट कर तेरी बदन की डाली को
लहु जिगर का दूंगा इसी लबो की लाली को
झीनतच्या सौंदर्याच्या आक्रमणापुढे थंड झालेला विजय अरोरा आता तिच्या हातातील गिटार घेऊन गावू लागतो. तीही थेट कटाक्षाने हे प्रेम आक्रमण थोपवत असते.
एक दिन दिखला दूंगा मैं दीवाना
चुरा लिया है तुमने जो दिल को…
गाण्याचा शेवट प्रियकराच्या अशा आर्जवाने होतो. राहुल देव बर्मनच्या चाहत्यांच्या मते त्याचे हे सर्वोत्तम गाणे आहे. नेमक्याच वाद्यातून गाण्याचा मूड नेमका पकडलाय..
चुरा लिया है तुमने जो दिल को…
आशा भोसलेंचेही हे सर्वोत्तम प्रेम गीत ठरावे असा प्रेम मूड त्यांनी यात पकडलाय…
दिलीप ठाकूर