बॉलिवूड अभिनेत्रींचं फॅशन चाहत्यांना नेहमीच भुरळ घालणारं असतं. कार्यक्रम, पार्टी, रेड कार्पेट किंवा एअरपोर्ट लूक असो, प्रत्येक अभिनेत्रीची अनोखी स्टाईल स्टेटमेंट पाहायला मिळते. यामध्ये बॉलिवूडच्या अशा काही बहिणींची जोडी आहे, ज्यांची अनोखी फॅशन नेहमीच चाहत्यांना आकर्षित करते. त्यापैकीच पाच बहिणींच्या जोडींवर एक नजर टाकूयात…
फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर तिच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. सोनमसारखी बहिण असल्यावर मग स्टाईलिस्टची गरजंच काय? तिची बहिण रिया कपूरच्या मते सोनमच तिची आवडती मॉडेल आहे. कोणत्याही कार्यक्रमांसाठी कपडे निवडताना नेहमीच सोनमची मदत घेत असल्याचं रिया सांगते.

बॉलिवूडच्या कपूर बहिणींच्या फॅशनची स्तुती अनेकांकडून होते. बॉलिवूड गाजवणाऱ्या करिश्मा कपूर आणि करिना कपूर या दोघी बहिणी अनेकदा एकत्र शॉपिंगसाठीही जातात. पार्टी असो किंवा डिनर डेट्स करिश्मा आणि करिनाची स्टाईल सर्वांनाच आकर्षित करते.
बॉलिवूडमधल्या हॉट बहिणी कोण, असा प्रश्न जर कोणाला विचारला तर क्षणाचाही वेळ न घालवता मलायका आणि अमृता अरोराचंच नाव पुढे येईल. त्यांच्या सौंदर्याची जादू अशी आहे की, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी या बहिणी कधी एकत्र दिसल्या की आजही छायाचित्रकारांचे कॅमेरे आपसूक त्यांच्याकडेच वळतात. या फॅशनेबल बहिणींचं स्टाइल स्टेटमेन्ट अनेकजण फॉलो करतात.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची बहिणी शमिता शेट्टी यांचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतो. कॅज्युअल डे आऊटपासून रेड कार्पेटपर्यंत शिल्पा आणि शमिताची स्टाईल स्टेटमेन्ट नेहमीच पाहण्याजोगी असते.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच चर्चेत असलेल्या बहिणी म्हणजे जान्हवी कपूर आणि खुशी कपूर. श्रीदेवीच्या या दोन्ही मुली ‘स्टाईलिश दिवा’ आहेत असं म्हणायला हरकत नाही. एअरपोर्ट, जिम, पार्टी सर्वत्र या दोघींचं फॅशन कॅमेरांमध्ये टिपलं गेलं आहे.