सकाळी चहाच्या पहिल्या घोटासोबतच ट्विटरवर ट्वीट्स करण्यास सुरुवात करणाऱ्या बॉलीवूडकरांना सोशल मीडियाच्या माध्यमाने आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहण्याचे एक नवे साधन मिळाले होते. पण आता यापुढे जात बॉलीवूडची नवी फळी फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियापर्यंत मर्यादित राहण्याऐवजी यूटय़ूब चॅनल्सकडे आपला मोहरा वळवू लागले आहेत. नुकतेच ‘महिला दिना’चे निमित्त साधत रिचा चढ्ढाने यूटय़ूब चॅनलसाठी व्हिडीओ चित्रित केला असून दोन दिवसांमध्ये तो सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे.
आतापर्यंत घरच्या घरी व्हिडीओ चित्रित करून अपलोड करण्याचे एक माध्यम असलेले यूटय़ूब आता मात्र प्रसिद्धीसाठी उत्तम माध्यम बनले आहे. मुळात यूटय़ूब चॅनल्सवर व्हिडीओ बनविण्याचा खर्च आणि वेळ कमी लागतो. त्यात या चॅनल्सनाची प्रेक्षकसंख्या लाखाच्या घरात आहे. त्यामुळे एकाच वेळी कित्येक लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी अभिनेत्यांना या व्हिडीओच्या माध्यमातून मिळते. कित्येकदा यूटय़ूब चॅनल्स बॉलीवूडकरांसोबत व्हिडीओ तयार करताना एखाद्या सामाजिक मुद्दय़ावर हात घालणे पसंत करतात. त्यामुळे या कलाकारांना त्यांची सामाजिक प्रश्नांविषयक आपली भूमिका कोणत्याही अडथळ्याशिवाय या चॅनल्सवर मांडता येते. तसेच हे मुक्त व्यासपीठ असल्यामुळे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही थेट कलाकारांपर्यंत पोहोचतात. ही बाब लक्षात घेऊन आलिया भट, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, इमरान खान, कल्की कोचीन अशा नव्या फळीतील बॉलीवूड कलाकारांनी प्रसिद्धीसाठी आपला मोहरा यूटय़ूब्स चॅनल्सकडे वळविला आहे. नुकतेच महिला दिनाच्या निमित्ताने रिचा चढ्ढाने ‘कल्चर मशीन’ कंपनीच्या ‘आदिती मित्तल’च्या यूटय़ूब चॅनलअंतर्गत ‘द अरेंज्ड डेट’ हा व्हिडीओ बनविला होता. लग्नाळू मुलीकडून घरच्यांच्या असलेल्या अवास्तव मागण्या आणि त्यावर तिचा दृष्टिकोन यावर गाण्याच्या माध्यमातून मार्मिक टीका केली आहे. ‘शुद्ध देसी एिण्डग’ या चित्रपटांचे मार्मिक पद्धतीने परीक्षण करणाऱ्या यूटय़ूब चॅनलने वरुण धवनच्या ‘बदलापूर’ चित्रपटाचे परीक्षण कार्टून्सच्या माध्यमातून परीक्षण केले होते. वरुणनेही आपल्याला तो व्हिडीओ आवडल्याचे ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगत, व्हिडीओचाहत्यांसोबत शेअर केला.
यूटय़ूब चॅनल्सच्या बाबतीत आलिया भटचे नाव कायमच चर्चेत राहिले आहे. तिच्या ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ती पहिल्यांदा यूटय़ूब चॅनलवर आली होती. त्यानंतर ‘जीनिअस ऑफ द ईयर’ हा व्हिडीओही अल्पावधीमध्ये यूटय़ूबवर प्रसिद्ध झाला होता. त्या व्हिडीओने आतापर्यंत तब्बल ५ कोटीपेक्षा अधिक प्रेक्षकवर्ग मिळविला आहे. इम्रान खानचाही समलिंगी संबंधांवर भाष्य करणारा व्हिडीओ यूटय़ूबवर बराच गाजला होता. परिणीती चोप्रा, रणवीर सिंग यांनीही आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी इतर माध्यमांसोबतच यूटय़ूब चॅनलवरील विनोदी कार्यक्रमात भाग घेऊन स्वत:वरील विनोदावर मनसोक्त दाद दिली होती.